पक्षांचे घरे होताहेत उध्वस्त ! माणिकगड पहाडावर होतेय अवैध वृक्षतोड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 02:01 PM2024-10-17T14:01:58+5:302024-10-17T14:03:55+5:30
वृक्षतोडीवर वेळीच लक्ष देणे गरजेचे : महाराजगुडा परिसरातील जंगल झाले कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : डोंगरदऱ्यात, माणिकगड पहाडात वसलेला जिवती तालुका नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. तालुक्यातील महाराजगुडा या गावालगत जंगो देवी आदिवासी समाजाचे देवस्थान आहे. या देवस्थान परिसरात मोठे जंगल होते. अवैध वृक्षतोडीमुळे आज तेथील जंगलाचे प्रमाण कमी झाले आहे. यासह तालुक्यातील जंगल परिसरात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्याने माणिकगड पहाडावरील घनदाट जंगलाचे प्रमाण कमी होऊन घनदाट जंगलाचे सौंदर्य धोक्यात आले आहे. तसेच दिवसेंदिवस कमी होत असलेले जंगलाचे प्रमाण मानवी जीवनासाठीही धोक्याची घंटा असल्याने याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
मानवी जीवनातील असंख्य संकटे ही निसर्गावर अवलंबून आहेत. कोरोना काळात ऑक्सिजनअभावी अनेक जीव गेले. झाडांमुळे आक्सिजन मिळते, हे सर्वांना माहीत असून देखील कुणीही या झाडांची किंमत करत नाहीत. पाऊस का चांगला होत नाही, नदी, नाले, तलाव तुडुंब का भरत नाहीत, हवामान बदल का होत आहे, जंगलातील प्राणी जंगलातच का राहत नाहीत, पशुपक्त्यांची झाडावरची घरटी कुठेही आता का दिसत नाही, पहाटेच्या वेळी चिमण्यांचा किलबिलाट का कमी झाला यासारख्या अनेक समस्या व प्रश्न मानवाने आपल्या सोयीसाठी जंगलतोड करून स्वतःहून निर्माण केल्यात. ही स्थिती आता जिवती तालुक्यातही पाहायला मिळत आहे.
अन्यथा पहाडावरील सौंदर्य येऊ शकते धोक्यात
- येणारी पुढील पिढी झाडांच्या सान्निध्यात जगविण्यासाठी झाडे लावून संवर्धन करणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे सर्वांनी अवैध वृक्षतोड न करता झाडे लावण्याची चळवळ उभी केल्यास पर्यावरणाचे रक्षण होईल.
- मात्र असे होताना दिसून येत नाही. तालुक्यात जंगल परिसरात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. दक्षता विभाग नावापुरता शिल्लक आहे.
- दिवसाढवळ्ळ्या होणारी झाडांची कत्तल रोखून वन गुन्हेगाराचे आक्रमण नाही थोपविल्यास माणिकगड पहाडावरील घनदाट जंगलाचे सौंदर्य धोक्यात येणार हे नक्की. याकडे संबंधित विभागाने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.