विसापुरात 'त्याच्या' सामाजिक बांधिलकीचे होत आहे कौतुक
By राजेश भोजेकर | Published: September 20, 2023 05:19 PM2023-09-20T17:19:38+5:302023-09-20T17:27:24+5:30
सामाजिक सलोख्यासाठीच्या प्रयत्नाचे होतेय कौतुक
चंद्रपूर : गणेशोत्सवाची परंपरा स्वातंत्र्योत्तर काळापासून सर्वत्र रुजली आहे. लोकमान्य टिळक यांनी सुरु केलेला हा सार्वजनिक उत्सव आज घरा घरापर्यंत पोहचला आहे. मंगळवारी मंगलमय वातावरणात गणपती बाप्पा सर्वत्र विराजमान झाले. बल्लारपूर तालुक्यातील विसापूरतही गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. परंतु येथील वार्ड तीनमध्ये एका घरगुती गणपती विराजमान करण्यात आला तिथे ''त्याच्या'' सामाजिक बांधिलकीचे दर्शनाने सगळीकडे कौतुक होत आहे. त्याची प्रत्यक्ष कृती सामाजिक सलोख्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. तो व्यक्ती म्हणजे गुड्डू शेख.
देश भरात आजघडीला हिंदू - मुस्लिम वादाचे नेहमी पडसाद उमटताना दिसत आहे. हा प्रकार सामाजिक सामाजिक वातावरण दूषित करणारा ठरत आहे. मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले गुड्डू शेख यांनी सर्वधर्म समभाव दर्शविणारी कृती समाजाला प्रेरणादायी ठरणारी आहे. त्याचे मित्र रवी कोट्टलवार यांच्या घरी काल दिनांक १९ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावेळी हा मान कोट्टलवार परिवाराने मुस्लिम समाजातील गुड्डू शेख यांना दिला.
विसापूर येथील रवी कोट्टलवार हे मागील अनेक वर्षांपासून आराध्य दैवत श्री गणेश मूर्तीची दरवर्षी घरी प्रतिष्ठापना करतात. मात्र यावर्षी गणपती बाप्पा विराजमान करण्यासाठी गुड्डू शेख यांना पाचरण करून त्याचे कडून श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी सहयोग केला. ही बाब समाज माध्यमावर चर्चिली जात आहे. यामुळे सर्वत्र सर्वधर्म समभावाचि प्रचिती येत आहे. सामाजिक सलोख्यासाठीचा त्याच्या प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे. हिंदू - मुस्लिम समाजातील दुरी कमी करून साऱ्यांना प्रेरणादायी आहे.