लाडकी बहीण योजना निरंतर सुरू राहणार; सरकार पुन्हा आल्यानंतर रकमेत वाढ करू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 14:38 IST2024-08-23T14:36:44+5:302024-08-23T14:38:16+5:30
सुधीर मुनगंटीवार : बल्लारपुरात रक्षाबंधन कार्यक्रम

The "Ladki bahin" scheme will continue; We will increase the amount once the government comes again
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : आर्थिकदृष्ट्या मागे पडलेल्या महिलांकरिता राज्य शासनाने सुरू केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या महिन्याला १ हजार ५०० रुपये देणाऱ्या योजनेचा अर्ज भरण्याच्या मदतीची चिंता करू नका. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहील. राज्यात आमचे सरकार पुन्हा आल्यानंतर रकमेत आणखी वाढ करून ती ३ हजार रुपये करू. महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे हाच योजनेचा हेतू आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मंगळवारी (दि. २०) गांधी पुतळ्याजवळ 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजप जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष वैशाली जोशी, विद्या देवाळकर, सारिका कणकम, शुभांगी शर्मा, जयश्री मोहुर्ले, सुवर्णा भटारकर, आरती आक्केवार, किरण दुधे, कांता ढोके आदी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेची उपयुक्तता व मिळत असलेला प्रतिसाद उत्तम आहे. महिलांच्या आरोग्यासाठी शिबिर घेण्यात येईल. आवास योजनेतून मिळणाऱ्या घरांच्या नावावर तसेच नझुल पट्ट्यांवर पुरुषांसोबत त्यांच्या पत्नीचे नाव असेल. महिलांच्या हक्क व उन्नतीसाठी शासनाच्या नवनवीन योजना असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक वैशाली जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन मोहुर्ले यांनी केले.