चंद्रपूरची जीवनदायीनी इरई नदीचे रूपडे पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 05:00 AM2022-02-24T05:00:00+5:302022-02-24T05:00:35+5:30
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, इरईचे खोलीकरण, सौंदर्यीकरण व संवर्धन करण्यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार हे सतत पाठपुरावा करीत आहेत. शासनही यासाठी सकारात्मक आहे. पहिल्या टप्प्यात नदीचे पात्र मोकळे केले तर पाणी कुठे थांबते, कुठून निघून जाते, पूर परिस्थिती कशामुळे निर्माण होते, या बाबींचा अंदाज येईल. त्यामुळे नदीचा गाळ काढून खोलीकरण करणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इरई नदी चंद्रपूर शहराला सुमारे सात किलोमीटर समांतर वाहते. नदीचे पात्र रुंद झाल्याने पावसाळ्यात अनेकदा पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात तत्काळ उपाययोजना म्हणून नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे आढावा बैठकीत दिले. या निर्णयामुळे चंद्रपूरची जीवनदायीनी इरई नदीचे रूपडे पालटण्याची आशा निर्माण झाली आहे.
यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, बांधकाम अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, पद्माकर पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, कार्यकारी अभियंता एस.बी. काळे, कुंभे, उपविभागीय अभियंता दि. ना. मदनकर सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, इरईचे खोलीकरण, सौंदर्यीकरण व संवर्धन करण्यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार हे सतत पाठपुरावा करीत आहेत. शासनही यासाठी सकारात्मक आहे. पहिल्या टप्प्यात नदीचे पात्र मोकळे केले तर पाणी कुठे थांबते, कुठून निघून जाते, पूर परिस्थिती कशामुळे निर्माण होते, या बाबींचा अंदाज येईल. त्यामुळे नदीचा गाळ काढून खोलीकरण करणे आवश्यक आहे. या कामासाठी विदर्भ सिंचन महामंडळाकडील मशीन दिल्या जातील. जिल्हा नियोजन समितीतून डिझेलसाठी निधीची तरतूद करावी. जेणेकरून कामाला तत्काळ सुरुवात होईल. पुढील वर्षी इरई नदीच्या संवर्धनासाठी अतिरिक्त निधी देऊ, अशी ग्वाही ना. पवार यांनी दिली.
इरईसाठी जादा निधी द्यावा- विजय वडेट्टीवार
- इरई नदीचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण, संवर्धन, बंधारे व विकासासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
- पूरप्रतिबंधासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागातून निधी देऊ; मात्र गॅबियन बंधाऱ्यासाठी जलसंपदा विभागाने निधी द्यावा, अशी मागणीही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी बैठकीत केली.
ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर वढा तीर्थक्षेत्राचा विकास
- वर्धा व पैनगंगा संगमावरील वढा हे ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव आहे. ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर या तीर्थक्षेत्राचा विकास होईल. त्यासाठी जांभा दगडाचा वापर केला जाईल.
- कामांसाठी ४४ कोटी प्रस्तावित आहे. दोन वर्षांत २५ कोटी दिल्यास उर्वरित निधी खनिज विकास निधी व नियोजन समितीतून देता येईल.
- वढा येथे ‘प्रति पंढरी’ साकार करू, असेही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी बैठकीत सांगितले.
५७२ कोटींचा इरई विकास आराखडा
- स्वच्छता व खोलीकरणासाठी (१७ किमी.) - २५ कोटी
- डाव्या किंवा उजव्या बाजूने एक किमी सौंदर्यीकरण- २०० कोटी
- दाताळा पुलाखालील २२८ मीटर लांबीचा बंधारा - २० कोटी
- डाव्या व उजव्या तिरावरील संरक्षक भिंत- ३२० कोटी
- इरई नदीशी संबंधित इतर विकासकामे- ७ कोटी