मासाेळीने छातीवर शेपटी मारल्याने मासेमाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2023 07:27 PM2023-02-24T19:27:42+5:302023-02-24T20:40:17+5:30
Chandrapur News मासेमारी करताना मोठ्या मासोळीने तुकाराम कोडापे यांच्या छातीवर जोरदार प्रहार केला. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
चंद्रपूर : आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी सातारा येथील तुकाराम कोडापे (७०) अनेक वर्षांपासून मच्छीमारी करून आपल्या परिवाराचे पालनपोषण करीत होते. मात्र हयातभर रोजी-रोटी देणाऱ्या मच्छीनेच कोडापे यांचा घात केला. मासेमारी करताना मोठ्या मासोळीने तुकाराम कोडापे यांच्या छातीवर जोरदार प्रहार केला. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
चिमूर तालुक्यातील सातारा येथील वाल्मिकी मच्छीमार संस्थेचे सदस्य तुकाराम कोडापे गावाशेजारी असलेल्या टेकेपार येथील मामा तलावात नेहमीप्रमाणे सहकाऱ्यांसोबत मासेमारीसाठी गेले. नेहमीप्रमाणे तुकाराम व सहकारी मच्छी पकडण्यासाठी तलावात उतरले. दरम्यान मच्छीमारी करीत असताना मोठ्या मासोळीने तुकाराम यांच्या छातीवर जोरदार प्रहार केला. छाती दुखत असल्याने सहकाऱ्यांनी तुकाराम यांना तलावाच्या काठावरील त्यांच्या झोपडीत आणून छातीला बाम लावून दिला. मात्र, काही वेळातच त्यांनी हालचाल बंद केली. पोलीस पाटील यांच्या मदतीने चिमूर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तुकाराम यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेचा तपास ठाणेदार मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते करीत आहेत.