घरातील कर्ताधर्ता माणूस गेला, मदत तरी वेळेवर मिळेल का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 05:00 AM2022-04-28T05:00:00+5:302022-04-28T05:00:34+5:30
कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या वारसांना शासनातर्फे अर्थसाहाय्य म्हणून ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. यासाठी वारसांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ८८३ वारसांनी अर्ज केले असून, यातील २ हजार ३३८ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. घरातील कर्ताधर्ता माणूस गेला मदत तरी वेळेवर मिळेल का?, अशी विचारणा मृतकांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या वारसांना शासनातर्फे अर्थसाहाय्य म्हणून ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. यासाठी वारसांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ८८३ वारसांनी अर्ज केले असून, यातील २ हजार ३३८ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. घरातील कर्ताधर्ता माणूस गेला मदत तरी वेळेवर मिळेल का?, अशी विचारणा मृतकांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचे आदेश न्यायालयाने केंद्राच्या मदत व पुनर्वसन विभागाला दिले होते. त्यानुसार केंद्र शासनाने राज्य शासनाला आदेशित करून आर्थिक मदत देण्यात आदेश दिले. दरम्यान, वारसांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.
त्रुट्यांमुळे ३९५ अर्ज बाद
- कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या काही वारसदारांनी मदतीसाठी अर्ज केले.
- जिल्ह्यातील ३९५ अर्ज विविध त्रुट्यांमुळे बाद झाले आहे.
- या अर्जदारांनी पुन्हा प्रशासकीय कार्यालयात मदतीसाठी पायपीट सुरु केली आहे.
यामुळे अडली वारसांना मदत
कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या संबंधित वारसदारांनी अर्ज केले आहे. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना मदत मिळाली नाही. यामध्ये वारसदारांमधील वाद, नेमका मृत्यू कोरोनाने झाला का,यासंदर्भात पुरावा नसणे आदी कारणामुळे मदत अडली आहे.
मदत कधी मिळणार?
मदतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आला आहे. मात्र अजूनही मदत मिळाली नाही. शासनाने याकडे लक्ष देऊन आर्थिक मदत त्वरित केल्यास कुटुंबांना आधार मिळेल. जिल्ह्यातील अनेकांचे प्रकरण मंजूर झाले आहे. मात्र खात्यात पैसे आले नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर काहींनी मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती निवारण कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयात चकरा मारल्या असून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
शहरातील अर्ज अधिक
- जिल्ह्यातून मदतीसाठी प्राप्त अर्जापैकी शहरी भागातील तसेच मनपा क्षेत्रातील अर्ज सर्वाधिक आहे. तर काहींनी अर्ज बाद झाल्यानंतर दुसऱ्यांदा अर्ज सादर केले आहे.