मालमत्ता जितकी जास्त, तितकी उमेदवारांची धावपळ अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 03:04 PM2024-10-26T15:04:15+5:302024-10-26T15:29:40+5:30
कागदपत्रांच्या जोडणीसाठी पाच-सहाजण कामात : अनेकांनी यापूर्वीच केली तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ज्याला खरोखरच निवडणूक लढवायची आहे, अशा इच्छुकांना अर्ज भरायला आधी आठ-दहा दिवस धावपळ करावी लागते. कारण त्यात इतकी माहिती द्यावी लागते की, ती कागदपत्रे गोळा करताना अक्षरशः जीव मेटाकुटीला येतो. अर्थात प्रस्थापित राजकीय नेते यासाठी पाच-सहा जणांची 'टीम'च कामाला लावत आहेत. उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता जितकी जास्त तितकी धावपळ अधिक असे चित्र आहे.
विधानसभेसाठी अर्ज जरी मोफत मिळत असला तरी अर्ज दाखल करताना १० हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागते. इंग्रजी आणि मराठीमधील हा २८ पानी अर्ज आहे. यातील एक-एक रकाना वरून साधा दिसतो, परंतु त्यातील उत्पन्नाचे रकाने भरताना सीएचीही दमछाक होते. एका एका उमेदवाराची इतकी घरे, फ्लॅट, शेती, बिगरशेती जमीन, औद्योगिक जमीन, सोने, चांदी, हिरे, मोती, वाहने, शेअर्स ही सगळी माहिती द्यावी लागते. इतकेच नव्हे, तर कुठून किती कर्ज घेतले, याचाही तपशील द्यावा लागतो. हे गोळा करण्यासाठी इच्छुक महिनाभरपासूनच कामाला लागले.
बाजारभावाची किंमत द्यावी लागते
उमेदवाराने मालमत्ता खरेदी करताना किती किंमत होती, ती विकसित करण्यासाठी काय खर्च केला आणि या मालमत्तेची बाजार भावानुसार किमत किती, याची सविस्तर माहिती उमेदवाराला अर्जामध्ये नमूद करावी लागते. यातूनच जे सातत्याने निवड- णुकीला उभे राहतात. त्यांची पाच वर्षात मालमत्ता किती पट वाढली हेदेखील स्पष्ट होते.
माणसं ठरलेली
- मागील अनेक वर्षे प्रस्थापितांचे अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतील माणसं ठरलेली आहेत.
- यामध्ये शिक्षक, प्राध्यापक, अक्षर चांगले असलेला आणि आर्थिक साक्षर असलेल्या चार-पाच जणांची टीमच यासाठी नियुक्त असते.
- नाहरकत दाखले गोळा करण्यासाठी स्वतंत्र माणूस नेमण्यात येतो.
- अनेकांनी लकी माणसांच्याच हातातून अर्ज लिहून घेण्याची प्रथा आहे.
- अनेक इच्छुकांनी यापूर्वीच तयारी केली आहे. त्यामुळे धावपळ टळणार आहे.