‘त्या‘ वाघिणीच्या मृत्यूचे गूढ कायमच; गोंडपिपरी तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 03:54 PM2023-03-27T15:54:34+5:302023-03-27T15:56:56+5:30
धाबा वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव कक्षातील प्रकरण
गोंडपिपरी (चंद्रपूर) : मध्यचांदा वनविभागांतर्गत येत असलेल्या धाबा वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव परिसरातील जंगलातील कक्ष क्र. १६१ व १६३ मध्ये वाघिणीसह बछड्याचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आल्याने वन विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, या वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतचे गूढ अद्यापही वन विभाग उलगडू शकले नाही.
यापूर्वी तेलंगणा महाराष्ट्र सीमेवरील पोडसा येथे विषबाधेने वाघिणीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान, विद्युत तारांच्या स्पर्शानेदेखील वन्यप्राण्यांची शिकार झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या होत्या. धाबा वनपरिक्षेत्रात अधूनमधून वाघ, अस्वल, बिबट यांचे दर्शन नागरिकांना होत असते. या वनपरिक्षेत्रात उत्तम दर्जाचा सागवानाचा मोठा साठा आहे. सागवान चोरीच्या अनेक घटना उघडकीस येत असतात. अशावेळी वाघिणीचा व बछड्याचा मृत्यू नैसर्गिक, की शिकार करण्यात आली, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
कॅमेऱ्यात दिसली तेव्हा वाघीण होती गर्भवती
डिसेंबर महिन्यात चेक तळोधी येथे गायीची शिकार करणारी हीच वाघीण होती, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तेव्हा ती वाघीण गर्भवती असल्याचे कॅमेऱ्यात दिसले होते. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर अन्य बछडे होते का, याचा शोध वन विभागाकडून घेतल्या जात आहे. त्यासाठी गस्त सुरू असून, अनेक ठिकाणी कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. वाघिणीच्या व बछड्याच्या अवयवांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून, उत्तरीय तपासाचा रिपोर्ट आल्यावर मृत्यूचे कारण कळणार आहे. वाघीण व बछडा मृत्यूच्या घटनेसंदर्भात पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी घटनेची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचा आदेश दिल्याची माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली.