एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या अडीचशेच्या घरात
By राजेश भोजेकर | Published: April 19, 2023 06:10 PM2023-04-19T18:10:21+5:302023-04-19T18:11:00+5:30
मानव-वन्यजीव संघर्षही वाढला
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळेचंद्रपूर जिल्ह्याची ख्याती दिवसागणिक वाढतच आहे. यात नव्याने भर पडली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या ४४६ असून पैकी २५० च्या घरात वाघांची संख्या एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ही बाब चंद्रपूरसाठी अभिमानाची असली तरी मानव-वन्यजीव संघर्षही वाढला आहे. यावर शासनाने अदृश्य भिंतीचा प्रयोग पुढे आणला आहे.
महाराष्ट्रात ४४६ वाघांची नोंद घेण्यात आली आहे. विदर्भात वाघांची संख्या २३ टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये सर्वाधिक २०६ ते २४८ वाघ हे एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. भारतीय वन्यजीव संस्था व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने गणना केलेली आकडेवारी नुकतीच पंतप्रधानांनी जाहीर केली. यानुसार देशात ३ हजार १६७ वाघ असल्याचे जाहीर केले आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ असल्याच्या नोंदी आहेत. महाराष्ट्रात तब्बल ४४६ वाघ असल्याची नोंद घेण्यात आली आहे. या वाघांपैकी तब्बल २०६ ते २४८ वाघ हे एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ८७ ते ९१ ब्रम्हपुरी वनविभागात ५३ ते ६६, मध्य चांदा वनविभागात १०, वरोरा-भद्रावती वनक्षेत्रात १३, राजुरा विभागात २, कन्हाळगाव अभयारण्यात १३ ते २३, जुनोना वनक्षेत्रात वाघांची संख्या २६ ते ४३ आहेत.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा ६२५ चौ कि.मी. वनक्षेत्रात पसरलेला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघासाठी सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास आहे. वाघाच्या शिकारीसाठी मोठ्या संख्येने तृष्णभक्षक प्राणी ताडोबात आहे. यामुळेच एकट्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ८७ ते ९१ वाघ आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील उष्ण वातावरणामुळे प्रजनन क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.
वाघांच्या झुंजीही वाढल्या
मानव-वन्यजीव संघर्षासोबतच वाघांच्या झुंजीत वाढ झाली आहे. वाघांची पाहिजे तेवढे अधिवास क्षेत्र नसल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढले आहे. शिवाय दोन वाघाच्या झुंजीही वाढल्या आहे. यामध्ये वाघांचे मृत्यूही होत आहे. अलीकडेच ताडोबाच्या बफरमध्ये येत असलेल्या चंद्रपूर वनपरिक्षेत्रात झुंजीत दोनही वाघांचा मृत्यू झाला. तर मागील वर्षी ५२ आणि यावर्षी ७ जणांचा वाघाने बळी घेतल्याच्या घटना घडल्या आहे.