शिक्षण विभागाचे नियोजन ढासळले, इस्त्रोला जाणारे विद्यार्थी हिरमुसले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:15 PM2023-03-28T12:15:24+5:302023-03-28T15:21:27+5:30
आल्या पावली विद्यार्थी परतले : विद्यार्थ्यांनी रंगविलेले स्वप्न मिळाले धुळीस
चंद्रपूर : नवरात्र स्पर्धेतील विजयी झालेल्या जिल्हा परिषद शाळेतील ३५ विद्यार्थ्यांना इस्त्रोला जाण्याची संधी जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिली होती. यासाठी संपूर्ण तयारी करून २४ ते २७ मार्चदरम्यान, विद्यार्थ्यांना रेल्वेने नेण्याचे नियोजन झाले. यासाठी गावागावांतून विद्यार्थ्यांना चंद्रपूरला बोलाविण्यात आले. मात्र, ऐनवेळी सहल रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी रंगविलेले स्वप्न धुळीस मिळाले. आल्या पावली विद्यार्थ्यांना आपापल्या गावी परतावे लागते. शिक्षण विभागाच्या ढिगास नियोजनामुळे विद्यार्थी हिरमुसले असून, पालकांनीही संताप व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळांमध्ये दरवर्षी ‘नवरत्न’ स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. यावर्षी आयोजित केलेल्या स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेने मोठे गिफ्ट देत थेट इस्त्रो (भारतीय अवकाश संशोधन केंद्र) पाठविण्याचे नियोजन केले. इस्त्रो भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त केला गेला. एवढेच काय, तर विद्यार्थ्यांनी स्वप्नही रंगविणे सुरू केले.
दरम्यान, २४ ते २९ मार्चदरम्यान, विद्यार्थ्यांना रेल्वेने पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांना कळविण्यात आले. एवढेच नाही, तर नियोजित तारखेला उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले. इस्त्रोला जायचे असल्याने विद्यार्थ्यांनी महिनाभरापासून तयारी सुरू केली. शिक्षकांच्या प्रत्येक सूचनांचे पालन केले. दरम्यान, जाण्याचा दिवस आला. मिळालेल्या सूचनांनुसार विद्यार्थी चंद्रपुरात दाखल झाले. मात्र, ऐनवेळी रेल्वेचे आरक्षण झाले नसल्याचे कारण देत इस्त्रो सहल रद्द करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. महिनाभरापासून रंगविलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला. यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.
ऐनवेळी लगीनघाई
यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेतली असता, रेल्वेचे आरक्षण करताना घोळ झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, इस्त्रोने विद्यार्थ्यांच्या सहलीचा कार्यक्रम आखून दिला. त्या वेळेत जाणे गरजेचे होते. मात्र, रेल्वे आरक्षण झाले नसल्याने ऐनवेळी ट्रॅव्हल्सने विद्यार्थ्यांना नेण्याची तयारी केली. मात्र, अंतर दूर असल्याने ट्रॅव्हल्सने नेणे चुकीचे होईल, या कारणामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नसल्याची माहिती मिळाली आहे.
चौकशीचे आदेश
झालेल्या चुकीबाबत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्याची, तसेच यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.