चक्क पोलिस ठाण्यातच रंगला ५२ पत्त्यांचा खेळ; व्हायरल व्हिडीओने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2022 10:28 AM2022-12-03T10:28:10+5:302022-12-03T10:31:20+5:30
पोलिसांनी हिसकावला व्हिडीओ असलेला मोबाइल; पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
राजुरा (चंद्रपूर) :पोलिस जुगार अड्ड्यावर धाडी टाकतात. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतात, असे असताना चक्क पोलिस ठाण्यातच ५२ पत्त्यांचा खेळ खेळला जात असेल तर काय म्हणावे, असा सवाल राजुरा पोलिस ठाण्यात पोलिस जुगार खेळत असताना व्हायरल व्हिडीओ बघून विचारला जात आहे.
हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचताच ज्याने हे चित्रीकरण केले त्या युवकाचा मोबाइल पोलिसांनी हिसकावून घेतल्याची घटना घडली. याबाबत रोहित रघुनाथ बात्ताशंकर (२०) या तरुणाने थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. पोलिसांचा हा जुगार राजुऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
दोन महिन्यांपूर्वी राजुराचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे हे सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून येथील ठाणेदाराची जागा रिक्त आहे. ठाणेदाराचा प्रभार सहायक पोलिस निरीक्षकाकडे आहे. अशातच पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कर्मचारी जुगार खेळत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला.
या व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यातच जुगार खेळण्यात रमले असल्याचे दिसून येते. याचे कुणीतरी चित्रीकरण करीत असल्याची कल्पनाही त्यांना नव्हती. या व्हिडीओने राजुरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिस ठाण्यातच जुगार खेळण्याचे धाडस करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सूरज ठाकरे यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे व पोलिस अधीक्षक रवींद्र साळवे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या घडामोडीनंतर पोलिस शिपाई संदीप बुरडकर यांनी चित्रीकरण असलेला व्हिडीओ रोहित रघुनाथ बात्ताशंकर या तरुणाकडून बळजबरीने हिसकावून घेतल्याची घटना घडली. यावरून जुगार खेळत असतानाचा व्हिडीओ राजुरा पोलिस ठाण्यातीलच असल्याचे बोलले जात आहे. इतकचे नव्हे तर मोबाइल हिसकावल्याची तक्रारही पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक दरेकर म्हणाले, अशाप्रकारची कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात प्राप्त झाली नाही.