साहेब, ११ हजार रुपये असलेला कापसाचा भाव सात हजारांवर आला ना!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 01:18 PM2024-11-12T13:18:40+5:302024-11-12T13:20:12+5:30
कापसाच्या दरात घसरण : तीन वर्षांपूर्वी मिळाला ११ हजार रुपये भाव
आशिष खाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पळसगाव : दिवसागणिक शेतकऱ्यांच्या उपयोगी साहित्यांसह बी- बियाणे, खते, औषधी, मजुरी आदींच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे; परंतु त्याच मातीतून उगवणार पांढऱ्या सोन्याचे भाव गडगडताना दिसत आहे. तीन वर्षांपूर्वी कापसाला दहा हजारांच्या पलीकडे भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत होता; पण आजच्या घडीला कापसाचे चढलेले भाव चक्क चार हजारांनी उतरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
खरीप हंगामामध्ये मुख्य पीक म्हणून शेतकरी सोयाबीन, तूर, धान पिकांसोबत कापूस पिकांची बहुतांश शेतकरी लागवड करतात. कापूस पिकाला सहा महिन्याचा कालावधी असून उत्पादन क्षमता आता त्यात दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आता काहीच उरत नाही आहे.
कापूस पिकाला तीन वर्षांअगोदर नऊ हजारांपासून ते साडेअकरा हजार रुपयांपर्यंत चांगला भाव मिळत होता. भाव बऱ्यापैकी मिळत असल्यामुळे उत्पादन खर्च निघून काही पैसे शेतकऱ्यांना शिल्लक राहत होते; पण मागील दोन वर्षांपासून कापसाच्या दरात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे.
त्यामुळे आता दिवसेंदिवस कापूस पिकाची शेती ही तोट्यात जात आहे. कापूस पिकाला ७५२१ रुपये शासनाने हमीभाव ठरवून दिलेला आहे; परंतु अद्यापही शेतकऱ्यांचा कापूस या हमीभावाने घेतल्याचे दिसून आले नाही. सात हजार रुपयांपासून बाजार मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात आहे.
एवढ्या भावामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे समोरील हंगामासाठी पैशाची तरतूद कुठून करायची, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे.
"शासनाच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा पोकळ ठरल्या आहेत. उलट शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही; पण कापसाचा ११ हजार रुपयांवर गेलेला भाव आज सात हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे."
-पद्माकर देरकर, शेतकरी, पळसगाव
"एक एकरमध्ये १६ हजार रुपयांचे सोयाबीन झाले. त्यात २० हजारांचा खर्च आला. सोयाबीनला जर सात हजार रुपये हमीभाव असता तर किमान खर्च तरी माझा निघाला असता."
- सूरज पोतराजे, शेतकरी, पळसगाव.
शेतकरी धोरणात हवाय बदल
मागील दहा वर्षांच्या काळात शेतमालाच्या हमीभावात शासनाने भाववाढ केली असली, तरीही भाववाढ उत्पादनखचर्चापेक्षा कमीच आहे. खासगी बाजारात मालाचे भाव हमीभावापेक्षा कमीच राहत आहेत. त्यावर शासनाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे. शेतमालाचे भाव आणि इतर वस्तूंची झालेली भाववाढ यामध्ये कमालीची तफावत आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या आयुष्यात काळोख दिवसेंदिवस निर्माण होत आहे. मागील दहा वर्षांच्या काळात ज्याप्रमाणे खताचे भाव वाढले, त्याच तुलनेत जर शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाचे भाव जर वाढवून दिले तरच शेतकरी आर्थिक सक्षम होईल.