अक्षम्य हलगर्जीमुळेच कोसळला रेल्वे ब्रीज, दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 08:31 AM2022-11-29T08:31:09+5:302022-11-29T08:32:57+5:30
दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू
बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : रविवारी सायंकाळी बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे या भगदाडातून १७ प्रवासी खाली रेल्वे रुळावर पडून जखमी झाले. यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर १६ जण जखमी झाले. हा ब्रीज कोसळण्यामागे रेल्वे प्रशासनाची हलगर्जीच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी सकाळपासूनच नागपूरची टीम बोलावून रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे. सायंकाळी ४ वाजता प्लॅटफार्म १ व २ वर रेल्वेगाड्यांसाठी मार्ग खुला करण्यात आला आहे.
विभागीय संचालक तळ ठोकून
रेल्वेचे विभागीय रेल्वे मंडळ व्यवस्थापक ऋचा खरे या आपल्या अधिकाऱ्यांसह दाखल झाल्या. सध्या त्या रेस्ट हाउसमध्ये तळ ठोकून आहेत. येथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चौकशी सुरू केली आहे.
लोकप्रतिनिधींनी केली पाहणी
चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. सोमवारी सकाळी माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही पुलाची पाहणी केली व डीआरएम ऋचा खरे यांना भेटून चर्चा केली.
मृत महिलेच्या कुटुंबीयांना ५ लाख
मुंबई : बल्लारपूर दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये अर्थसाहाय्य देण्याचीही घोषणा सोमवारी केली. याशिवाय जे जखमी झाले असतील त्यांच्यावर योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला
दिले आहेत.