मातृ दिनाच्या दुसऱ्याच दिवशी मातृप्रेमाची प्रचिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 05:00 AM2022-05-12T05:00:00+5:302022-05-12T05:00:24+5:30

तिने पाठलाग करून बिबट्याला गाठले. तिचा पोटचा गोळा बिबट्याच्या जबड्यात होता. हृदयाचे ठोके चुकविणारे दृश्य बघून आई जराशीही डगमगली नाही. तिने एकटीने पूर्ण शक्ती एकवटून शूरवीरपणे केवळ काठी हातात घेऊन बिबट्याशी लढा दिला. मातेच्या या आक्रमकतेने नरभक्षी बिबट्या चिमुकलीला सोडून पसार झाला. तिने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकलीला उचलून अंगणात आणले.

The realization of motherly love on the second day of Mother's Day | मातृ दिनाच्या दुसऱ्याच दिवशी मातृप्रेमाची प्रचिती

मातृ दिनाच्या दुसऱ्याच दिवशी मातृप्रेमाची प्रचिती

Next

अजिंक्य वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
दुर्गापूर : मोलमजुरीच्या कामात काबाडकष्ट करून थकून भागून घरी परतलेली माता नुकतीच स्नानाला गेली होती. तोच अंगणात बसलेल्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला. तिने न डगमगता शूरवीरपणे आपल्या जिवाची पर्वा न करता  बिबट्याशी लढा दिला व बिबट्याच्या जबड्यातून आपल्या पोटच्या गोळ्याची सुटका केली. या शूर मातेने मातृ प्रेमाखातर केलेल्या कामगिरीचा मातृ दिनाच्या दुसऱ्याच दिवशी मातृ प्रेम काय आहे हे  दाखवून  मोठा संदेश दिला आहे. ज्योती जगजीवन कोपुलवार असे या मातेचे नाव आहे.
आराध्या (८) व आरक्षा कोपुलवार (अडीच वर्षे) या दोघीही चिमुकल्या बहिणी अंगणात बसून जेवण करीत होत्या. त्यांची आई बाजूलाच बाथरुममध्ये स्नान करत होती. आरक्षाचे जेवण झाल्यानंतर तिथेच खेळत होती. 
अंगणात लाईटचा लख्ख प्रकाश होता. उजेडातच त्या परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने  आरक्षावर झडप घेतली. मानेला पकडून फरफटत काही अंतरावर घेऊन गेला. आई आई म्हणून आरक्षा जोरजोराने किंचाळत होती. स्नान करत असलेली आई क्षणाचाही विलंब न करता काठी घेऊन त्या दिशेने धावत निघाली. 
तिने पाठलाग करून बिबट्याला गाठले. तिचा पोटचा गोळा बिबट्याच्या जबड्यात होता. हृदयाचे ठोके चुकविणारे दृश्य बघून आई जराशीही डगमगली नाही. तिने एकटीने पूर्ण शक्ती एकवटून शूरवीरपणे केवळ काठी हातात घेऊन बिबट्याशी लढा दिला. 
मातेच्या या आक्रमकतेने नरभक्षी बिबट्या चिमुकलीला सोडून पसार झाला. तिने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकलीला उचलून अंगणात आणले. डाव्या बाजूचा गाल व मानेवर बिबट्याच्या दाताच्या खोलवर जखमा झाल्याने चिमुकली     रक्तबंबाळ होऊन आईसुद्धा तिच्या रक्ताने न्हाऊन निघाली होती. या मातेच्या मातृप्रेमाने पोटच्या गोळ्याचा जीव वाचला.

संकटाचा केला सामना
आंतरराष्ट्रीय मातृ दिनाच्या दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या घटनेवरून आईचे मुलाप्रती असलेल्या जिवापाड प्रेमाची प्रचिती आली. तिने आपल्या प्राणाची बाजी लावत चिमुकलीला बिबट्याच्या जबड्यातून सोडविले. मोलमजुरी करणारे हे गरीब कुटुंब आहे. या आईने ओढवलेल्या संकटाचा मोठ्या शिताफीने सामना केला.  याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Web Title: The realization of motherly love on the second day of Mother's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.