महत्त्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 05:00 AM2022-03-28T05:00:00+5:302022-03-28T05:00:01+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यात महत्त्वाचे फलनिश्चिती क्षेत्र जसे ऑनलाईन सातबारा, ई-फेरफार, शासकीय महसूल वसुली, सातबारा वाटप, प्रलंबित लेखापरिच्छेद निकाली काढणे, अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढणे याबाबत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी गुल्हाने यांचा सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महसूल विभागाशी निगडित सामान्य जनतेचे प्रश्न त्वरित सोडवून नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने नागपूर येथे दोनदिवसीय महसूल परिषद नुकतीच पार पडली. यात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या नेतृत्वात महसूल विभागातील महत्त्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे चंद्रपूर जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना महसूल परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने (चंद्रपूर), आर. विमला (नागपूर), प्रेरणा देशभ्रतार (वर्धा), संदीप कदम (भंडारा), संजय मीना (गडचिरोली), नयना गुंडे (गोंदिया) उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ‘जमीनविषयक कायद्यातील तरतुदी व सुधारणा’ तसेच ‘अर्धन्यायिक कामकाज’ याबाबत दोन सत्रांत महसूल यंत्रणेला मार्गदर्शन केले.