स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 'या' गावात पोहोचली लालपरी; ग्रामस्थांनी नारळ फोडून केली पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 12:14 PM2022-07-04T12:14:54+5:302022-07-04T12:30:12+5:30
भद्रावती तालुक्यातील विसलोन येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एस.टी. महामंडळाची लालपरी पोहोचली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
संदीप झाडे
कूचना (चंद्रपूर) : देशभरात विकासाच्या दृष्टीकोनातून विविध कार्य सुरू आहेत. मेट्रोपासून-बुलेट ट्रेनपर्यंतची सेवा जनतेला उपलब्ध करून देण्याचं कार्य प्रगतीपथावर आहे. पण, देशातील काही असेही भाग आहेत जिथे ट्रेन तर सोडाच साधी बससेवाही उपलब्ध नाही. अशाच एका गावात शनिवारी एसटी महामंडळाची बस पहिल्यांदाच पोहोचली. तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरे आहे. भद्रावती तालुक्यातील विसलोन हे आडमार्गातील गाव. वरोरा आगारातून १२ कि.मी. अंतरावर असलेल्या विसलोन गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लालपरी पोहोचली. पहिल्यांदा बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थ आणि खास करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
भद्रावती तालुक्यातील विसलोन, पळसगाव, माजरी वस्ती या भागातील गावांना या बसमुळे मोठा आधार मिळाला आहे. या गावांना वर्षानुवर्षे येथील प्रवाशांना वैयक्तिक व खासगी वाहनांशिवाय इतर प्रवाशांचे कुठलेही साधन नव्हते. त्यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी वरोरा जाण्यासाठी दमछाक होत असे. तसेच बस पकडायची असल्यास नंदोरी किंवा कुचना येथे जावे लागत होते. त्यासाठी सहा कि.मी.ची पायपीट करावी लागत होती. विशेषतः चौथ्या वर्गानंतर विद्यार्थ्यांना नंदोरीला पायी जावे लागायचे. मात्र या गावासाठी प्रवीण सूर यांच्या प्रयत्नातून बस चालू झाल्याने या गावातील जनतेच्या आनंदाला पारावर उरला नाही. विसलोन गावात पहिल्यांदा आलेल्या आगार व्यवस्थापक, चालक-वाहकांचे शाल श्रीफळ सत्कार केला तर बसचीही नारळ फोडून पूजा केली.
तांत्रिक बाबी तपासल्या
सध्या तांत्रिक बाबी तपासण्यासाठी शनिवारी वरोरा बसस्थानकातून बस वरोरा-नंदोरी-विसलोन मार्गावर धावली. सदर बस गुरुवारपासून नियमित सुरू होणार असून सकाळी ७,१० दुपारी १ वाजता व सायं.५ वाजता अशा चार फेऱ्यांमध्ये धावणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली.यावेळी अन्य गावकरी महिलावर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच विसलोन गावात बस आली. या गावात ये-जा करण्यासाठी कुठलेच साधन नव्हते. मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी सहा किलोमीटर पायदळ पायपीट करावी लागायची. मात्र, बस सुरू झाल्याने गावकऱ्यांचा आनंद आहे.
-प्रवीण सूर, माजी जि. प. सदस्य, माजरी