भारताच्या त्रिकोणमितीय भूमापनाची सुरूवात करणाऱ्या एका साहसी सर्वेक्षकाची गोष्ट!
By राजेश मडावी | Published: May 20, 2023 05:57 PM2023-05-20T17:57:34+5:302023-05-20T18:00:14+5:30
Chandrapur News कर्नल विल्यम लॅम्बटन या साहसी सर्वेक्षकाने दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून १० एप्रिल १८०२ राेजी भारताच्या त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात मद्रास जवळील थॉमस पर्वतापासून केली.
राजेश मडावी
चंद्रपूर : भूमी अभिलेख विभागात आता अत्याधुनिक साधनांचा वापर वाढला. मात्र, या विभागाची पाळेमुळे ब्रिटिश काळात रुजली. कर्नल विल्यम लॅम्बटन या साहसी सर्वेक्षकाने दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून १० एप्रिल १८०२ राेजी भारताच्या त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात मद्रास जवळील थॉमस पर्वतापासून केली. चंद्रपुरात पोहोचून तिथून सर्वाेच्च पर्वताकडे जाण्याच्या मोहिमेदरम्यान लॅम्बटनचे हिंगणघाट येथे निधन झाले. त्यांचा हा थरारक प्रवास व सर्वेक्षणाची उपयुक्तता पटवून देण्यासाठी ‘कर्नल विल्यम लॅम्बटन’ हा ग्रंथ मराठीत लिहिल्याची माहिती चंद्रपूरचे लेखक प्रा. डॉ. योगेश दुधपचारे यांनी शनिवारी ‘लोकमत’ला दिली.
कर्नल विल्यम लॅम्बटन हे झिरो माईलचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या द्विशताब्दी स्मृतिदिन समारोहानिमित्त हिंगणघाट येथे प्रा. डॉ. योगेश दुधपचारे यांच्या ग्रंथाचे प्रकाशन झाले होते. ग्रंथ लेखनाची कल्पना कशी सुचली याबाबत डॉ. दुधपचारे म्हणाले, जगभरात कर्नल विल्यम लॅम्बटनच्या ब्रिटिशकालीन भारतातील भूमापन योगदानाबाबत चर्चा होत असते. भारतीय भूमापनाच्या इतिहासातील कर्नल लॅम्बटन हे मानबिंदू असून भारतीय उपखंडाच्या भूमापनाचे खरे श्रेय त्यांनाच जाते. मात्र, भारताच्या त्रिकोणमितीय भूमापनाचे कार्य करताना हिंगणघाट येथे २० जानेवारी १८२३ रोजी निधन झालेल्या या महान सर्वेक्षकाबाबत मराठी विश्वात मूलगामी ग्रंथसंपदा उपलब्ध नाही. हे माझ्या लक्षात आले.
जॉर्ज एव्हरेस्ट व बरेच काही...
कर्नल लॅम्बटन यांच्या मृत्यूनंतर भूमापनाची ही जबाबदारी जॉर्ज एव्हरेस्ट यांच्यावर आली. कर्नल लॅम्बटन यांनी सुरू केलेल्या कामाला ४० वर्षानंतर त्यांनी मूर्त रूप दिले. जॉर्ज एव्हरेस्ट यांच्याच नावावरून जगातील सर्वोच्च उंचीच्या पर्वताला ‘एव्हरेस्ट पर्वत’ हे नाव मिळाले. याशिवाय भारतीय सर्वेक्षण इतिहासाची दूर्मिळ माहिती या ग्रंथात नोंदविल्याचे प्रा. दूधपचारे यांनी सांगितले.
मराठीतील उणीव काही अंशी दूर
महाराष्ट्रासह भारतातील सर्व भूमिअभिलेख विभागाच्या कार्यालयात कर्नल विल्यम लॅम्बटनचे छायाचित्र हमखास पाहायला मिळते. पण, लॅम्बटनच्या कार्याचे स्वरूप, वैशिष्ट्ये व सामाजिक उपयोगिता काही अधिकाऱ्यांनाही नीटपणे नागरिक व विद्यार्थ्यांना समजावून सांगता येत नाही. या ग्रंथाने मराठी ज्ञानविश्वातील ही उणीव काहीअंशी दूर होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
समाजाभिमुख संशोधन
शिक्षण, समाजकारण व पर्यावरणाच्या विविध आघाड्यांवर मी सक्रीय आहे. पीएचडी अथवा तत्सम पदवी मिळाली की स्वकोषातच रमण्याची शक्यता अधिक असते. माझ्या मनोपिंडाला हे कदापि पटणारे नाही. त्यामुळे व्यापक समाजमनाशी नाळ जोडावी, विद्यार्थी व नागरिकांच्या ज्ञानकक्षा रुंदाव्यात, भूमी अभिलेखाच्या भारतीय पाऊलखुणा कळाव्यात, यासाठी हे संशोधनात्मक पुस्तक मराठीत लिहिल्याचे प्रा. दूधपचारे यांनी सांगितले.