मनातल्या उमेदवाराच्या गळ्यात शिक्षकांनी घातली विजयाची माळ

By राजेश भोजेकर | Published: February 3, 2023 10:53 AM2023-02-03T10:53:03+5:302023-02-03T10:53:56+5:30

चंद्रपूरला पहिल्यांदाच मिळाला हक्काचा शिक्षक आमदार

The teachers made Sudhakar Adbale the winner, Chandrapur got a rightful teacher MLA for the first time | मनातल्या उमेदवाराच्या गळ्यात शिक्षकांनी घातली विजयाची माळ

मनातल्या उमेदवाराच्या गळ्यात शिक्षकांनी घातली विजयाची माळ

Next

चंद्रपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघाचा निकाल अखेर आला. या मतदार संघातून चंद्रपूरचे सुपुत्र महाविकास आघाडी समर्थित विमाशिचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी पहिल्या पसंतीच्या विक्रमी मतांनी भाजप समर्थित मराशिपचे उमेदवार नागो गाणार यांचा पराभव करून शिक्षक आमदार म्हणून विजयावर नाव कोरले. २०१७पासून ज्या आमदारकीचे स्वप्न पाहिले ते २०२३मध्ये पूर्ण झाले.

अडबाले यांच्या रूपाने नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या इतिहासात चंद्रपूरचे नाव प्रथमच कोरले गेले. हा विजय केवळ अडबाले यांचाच नसून तो मागील सात वर्षांपासून जे शिक्षक ज्यांना आधीच आमदार मानत होते त्यांना अडबाले यांच्या रूपाने मनातील आमदार मिळाला आहे. हा विजय शिक्षकांच्या दृष्टीने आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी राजकीय दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

२०१०पर्यंत १९८६चा अपवाद वगळता नागपूर शिक्षक मतदार संघावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचाच दबदबा राहिला आहे. याचे कारणही तसेच आहे. विमाशि हा नागपूर आणि अमरावती विभागात शिक्षकांचा सर्वात मोठा संघ आहे. १९९३, १९९८ व २००४ अशी तीन टर्म विश्वनाथ डायगव्हाणे यांनी विमाशि संघाच्या जोरावर शिक्षक आमदार म्हणून कारकीर्द पूर्ण केल्यानंतर आता विमाशिने नवा चेहरा द्यावा, अशी अंतर्गत धुसफूस सुरू झाली. मात्र, डायगव्हाणे हे मागे हटायला तयार नव्हते. परिणामी २०१०मध्ये विमाशिमध्ये फूट पडली.

विमाशिकडून डायगव्हाणे रिंगणात उतरले आणि चंद्रपुरातून लक्ष्मण बोढाले यांनी बंडखोरी केली. या बंडखोरीचा थेट फायदा भाजप समर्थित मराशिपचे नागो गाणार यांना मिळाला आणि ते निवडून आले. यानंतर २०१७मध्ये विमाशिने सुधाकर अडबाले यांच्या रूपाने चंद्रपूरला उमेदवारी द्यावी, असा सूर विमाशिमध्ये उमटू लागला. परंतु, त्यावेळी विमाशिने अडबाले यांना डावलून नागपूरचे आनंद कारेमोरे यांना निवडणूक रिंगणात उतरविले. अनेकांनी अडबाले यांना बंडखोरीचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी विमाशि संघ फुटू नये म्हणून एकनिष्ठ राहून कोरेमोरेंसाठी मते मागितली. मात्र, कोरेमोरे हे डमी उमेदवार असल्याचा प्रचार सुरू झाला. यावेळीही विमाशिच्या सदस्यांची मते फुटली आणि मराशिपचे गाणार दुसऱ्यांदा विजयी झाले.

सर्वाधिक सदस्य संख्या असतानाही बहुपसंतीचा उमेदवार न दिल्यामुळे मराशिपचा उमेदवार विजयी झाला. हा पराभव विमाशिच्या जिव्हारी लागला आणि तेव्हापासूनच विमाशिसह अनेक शिक्षकांनी सुधाकर अडबाले यांना मनातून आमदार मानणे सुरू केले. अखेर हा दिवस उजाडला. शिक्षकांनी आजच्या निकालातून हे स्वप्न प्रत्यक्षात साकारत अडबाले यांच्या गळ्यात मतातून आमदारकीची माळ घातली.

नागपूर शिक्षक मतदार संघाचा इतिहास

  • २०२३ - नागपूर विभाग - सुधाकर अडबाले - विमाशि
  • २०१७ - नागपूर विभाग - नागो गाणार - मराशिप
  • २०१० - नागपूर विभाग - नागो गाणार - मराशिप
  • २००४ - नागपूर विभाग - व्ही. यू. डायगव्हाणे - विमाशि
  • १९९८ - नागपूर विभाग - व्ही. यू. डायगव्हाणे - विमाशि
  • १९९३ - नागपूर विभाग - व्ही. यू. डायगव्हाणे - विमाशि
  • १९८६ - नागपूर विभाग - दिवाकर जोशी - मराशिप
  • १९७८ - विदर्भ विभाग - म. न. काळे - विमाशि

Web Title: The teachers made Sudhakar Adbale the winner, Chandrapur got a rightful teacher MLA for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.