नव्या संसद भवनाचे सौंदर्य खुलविणार बल्लारपूरचे सागवान; ३०० घनमीटर दर्जेदार लाकूड खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 01:27 PM2022-06-10T13:27:10+5:302022-06-10T14:07:47+5:30
बल्लारपूर आगारातील सागवान आंतरराष्ट्रीय टिक हार्वेस्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. या व्यवसायातून वन विकास महामंडळाने विक्रमी महसूल मिळविला.
बल्लारपूर (चंद्रपूर) : केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अर्थात भारताच्या नव्या संसद भवन बांधकामासाठी बल्लारपूर आगारातून लाकूड खरेदी करण्यात आले. ग्लोरी ऑफ फॉरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या जंगलातील हे अत्यंत सुबक व देखणे लाकूड संसद भवनाचे सौंदर्य खुलविण्यात मोलाची भर घालणार आहे. संसद भवनासाठी लाकडाची पुन्हा डिमांड केल्याने वन विकास महामंडळाच्या वाटचालीत ही बाब अभिमानास्पद ठरली आहे.
भारताच्या नव्या संसद भवनाचे बांधकाम वेगात सुरू आहे. बांधकामाचे कंत्राट टाटा उद्योग समूहाने घेतले. नवे संसद भवन अनेक वर्षे टिकावे आणि बांधकामाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय इंटेरियर डिझाईनच्या क्षेत्रात अव्वल ठरावी, यासाठी केंद्राकडून प्रयत्न सुरू आहेत. टाटा समूहाने इंटेरिअर डिझाईनचे काम मुंबईच्या नारसी इंटेरिअर डिझाईन कंपनीला दिले आहे. संसदीय कारकिर्दीचे वैभव वाढविणाऱ्या इमारतीसाठी वापरण्यात येणारे लाकूड उत्तम दर्जाचे असावे, यासाठी वन विकास महामंडळाच्या बल्लारपूर लाकूड आगाराची निवड करण्यात आली. या आगारातून आतापर्यंत ३०० घनमीटर सागवान लाकूड खरेदी करण्यात आले.
आशिया खंडातील प्रसिद्ध आगार
वन विकास महामंडळाचे बल्लारपूर येथील लाकूड आगार आशिया खंडात प्रसिद्ध आहे. राज्यातील काही महामंडळे डबघाईस येत असताना वनविकास महामंडळाने देशांतर्गत लाकूड व्यवसायात उच्चांक गाठला. मागील वर्षात ३०० कोटींची उलाढाल केली. मे २०२२ या एकाच महिन्यात तब्बल २२ कोटींचा नफा मिळविला. जम्मू काश्मीर, गुजरात,आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेशातील व्यापारी लिलावात सहभागी झाले. लिलावाप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक वासुदेव उपस्थित होते.
संसद भवनासाठी स्वदेशी व विदेशी लाकडांचा पर्याय पुढे आला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी सागवान लाकडाला विशेष पसंती दिली. त्यामुळे टाटा समूहाने देश-विदेशात सागवान लाकडासाठी प्रसिद्ध असलेल्या बल्लारपूर आगाराची निवड केली.
बल्लारपूर आगारातील सागवान आंतरराष्ट्रीय टिक हार्वेस्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. या व्यवसायातून महामंडळाने विक्रमी महसूल मिळविला. संसद भवनासाठी लागणारा लाकूड निवडताना अनेक चाचण्या झाल्या. त्यात बल्लारपूर आगारातील सागवान सरस ठरल्याने निवड झाली, ही बाब महामंडळासाठी अभिमानास्पद आहे.
- सुमित कुमार, प्रादेशिक व्यवस्थापक वन विकास महामंडळ