सावली विधानसभेच्या तत्कालीन आमदाराने भूषविले मुख्यमंत्री पद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 02:56 PM2024-10-24T14:56:01+5:302024-10-24T14:58:00+5:30
Chandrapur : मा. सा कन्नमवार यांनी केले महाराष्ट्राचे नेतृत्व
उदय गडकरी
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : परिसीमन आयोगाने गोठवलेल्या १५६ सावली विधानसभा क्षेत्रातून निवडून गेलेले स्व. मा. सा. कन्नमवार यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. ते महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. त्यानंतर स्व. वामनराव गड्डमवार, शोभाताई फडणवीस यांच्या गळ्यातसुद्धा मंत्रिपदाची माळ घालण्यात आली. शोभाताईंनी तर सलग चार पंचवार्षिक निवडणुका (९०, ९५, ९९, २००४) सावली विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. परंतु, या दोघांनाही मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारता आलेली नाही.
सन २००९मध्ये परिसीमन आयोगाने सावली विधानसभा क्षेत्र गोठवून सावली तालुक्याला ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात अंतर्भूत केले. सावली विधानसभा क्षेत्राचे अस्तित्वच मिटवून टाकले. १९५२मध्ये भारतात पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला. तेव्हापासूनच मध्य प्रांतात सावली विधानसभा क्षेत्राचे अस्तित्व होते. मात्र, एकमेव स्व. मा. सा. कन्नमवार यांचे मुख्यमंत्रिपद सोडले तर कुणीही नेता त्या पदापर्यंत पोहोचू शकला नाही.
६२ वर्ष पूर्ण
१९६२ मध्ये निवडून आलेल्या स्व. कन्नमवार यांच्या निवडणुकीलाही ६२ वर्षांचा कालावधी होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची पुनरावृत्ती या क्षेत्रातून झाल्यास जुन्या १५६ सावली विधानसभा क्षेत्राचा योगायोगच समजावा लागेल. महाराष्ट्रत पहिली निवडणूक १९६२ स्व. दादासाहेब कन्नमवार यांनी जिंकून ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर १९६७ स्व. वामनराव गड्डमवार, १९७२ स्व. यशोधरा बजाज, १९७८ देवराव भांडेकर, १९८०मध्ये स्व. महादेवराव ताजने, १९८५ स्व. वामनराव गड्डमवार, १९९० ते २००४ शोभाताई फडणवीस यांनी सावली विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व केले.