वाघाने हल्ला केला; मात्र गुराख्याने झुंज देत वाघाला पिटाळून लावले !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 01:33 PM2023-08-16T13:33:23+5:302023-08-16T13:34:36+5:30
काळ आला; मात्र वेळ आली नव्हती !
दिलीप मेश्राम
नवरगाव (चंद्रपूर) : जंगलात गुरे चारत असताना अचानक गुराखी सुनील सुधाकर नैताम याच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला. मात्र तितक्याच तत्परतेने सुनीलने वाघाशी झुंज देत वाघाला पळवून लावले. यामध्ये तो जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत नवरगाव उपक्षेत्रातील रत्नापूर बिटामध्ये रत्नापूर येथील गुराखी सुनील सुधाकर नैताम (३५) हा नेहमीप्रमाणे सोमवारी रत्नापूर बिटातील कक्ष क्रमांक ४४ मध्ये इतर सहकाऱ्यांसह गुरे चारत असताना अचानक पट्टेदार वाघाने पाठीमागून हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने सुनील घाबरला. मात्र लगेच स्वत:ला सावरत पलटून हातातील काठीने व कुऱ्हाडीने प्रतिकार केला. सोबत असलेले सहकारी केशव येसनसुरे यांना आवाज दिला.
वाघच तो; हरणार कसा?
दोन गुराख्यांनी मिळून वाघाचा हल्ला परतवून लावला. मात्र या संघर्षात वाघ प्रतिस्पर्धी होता. शिवाय तो भुकेला होता. त्यामुळे पोटाची भूक भागविण्यासाठी त्या दोघांना सोडल्यानंतर त्याने लगेच एका गायीवर हल्ला करून ठार मारले. घटनेची माहिती मिळताच रत्नापूर येथील वनरक्षक जे. एस. वैद्य यांनी जखमी सुनीलला ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचारासाठी दाखल केले.
अन् कुऱ्हाड खाली पडताच अवसान गळाले
वाघाशी झुंज देत असताना सुनीलच्या हातातील कुऱ्हाड खाली पडली आणि त्याचे अवसानच गळाले. आता आपला संघर्ष संपला, असे वाटत असतानाच सहकारी केशव येसनसुरे धावून आला. त्यानंतर दोघांनी मिळून त्या पट्टेदार वाघाचा हल्ला परतवून लावला. ‘होता केशव म्हणून वाचला सुनील’ असाच प्रकार तिथे घडला. मात्र वाघाच्या झटापटीत वाघाने सुनीलच्या पाठीवर, छातीवर आणि हातावर जखमा केल्या. सुनीलने स्वत:ला सावरून हिम्मत दाखविली नसती तर नक्कीच तो बळी ठरला असता. याशिवाय शेतात जवळच असलेल्या केशव येसनसुरे यांनीही धाडस दाखवून मदत केली नसती तर अनुचित घडले असते.