वाघाने महिलेला धरले जबड्यात; गावकऱ्यांनी हुसकावले पण....
By परिमल डोहणे | Published: May 20, 2023 07:01 PM2023-05-20T19:01:30+5:302023-05-20T19:02:23+5:30
Chandrapur News शेतात काम करताना झाडाखाली गेलेल्या महिलेला वाघाने जबड्यात धरून ठेवले. गावकऱ्यांच्या हुसकावण्याने वाघ निघून गेला मात्र ही महिला ठार झाली.
परिमल डोहणे
चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रातील वाघोली बुट्टी शिवारात पुन्हा वाघाने हल्ला करून एका महिलेला ठार केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. प्रेमिला मुकरू रोहणकर (५५, रा. वाघोली बुट्टी) असे मृतक महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, वाघोली बुट्टी परिसरात वाघाने चांगलाच उच्छाद मांडला असून, २० दिवसांपूर्वी याच परिसरात वाघाने ममता बोदलकर या महिलेला ठार केले होते.
वाघोली बुट्टी येथील प्रेमिला रोहणकर ही महिला शनिवारी शेतात काम करण्यासाठी गेली. दरम्यान, त्यांना शौचास लागल्याने त्या रस्त्यावरील एका झाडाखाली गेल्या. तिथेच वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांची आरडाओरड ऐकून दोन महिलांनी तिथे जाऊन बघितले असता वाघाने प्रेमिला यांना तोंडात पकडून ठेवले होते. त्यांनी घाबरून एकच आरडाओरडा केला. तेव्हा आजूबाजूला शेतात कामावर असणारे ५० ते ६० जण धावत आले. तरीही त्या वाघाने महिलेला तोंडातच पकडून ठेवले होते. काही वेळाने त्याने महिलेला तिथेच टाकले व पळून गेला. विशेष म्हणजे, शुक्रवारीही याच गावातील दोघे वाघाच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचले होते. पण, एक बकरी मारली गेली होती. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिस विभाग घटनास्थळी गेले.
यापूर्वीही झाले वाघाचे हल्ले
यापूर्वीही वाघाने याच परिसरात हल्ले चढविले आहेत. पत्रुजी भांडेकर यांच्यावर हल्ला केला आणि त्याच्या चार शेळ्या मारल्या. राजू गव्हारे यांच्यावरही हल्ला करीत जखमी केले, यावेळी त्यांची एक शेळी मारली. महेंद्र मेश्राम यांच्यावर हल्ला करून जखमी केले. भिकाजी गव्हारे यांची १ शेळी मारली, तर २० दिवसांपूर्वी ममता बोदलकर यांच्यावर हल्ला करून ठार केले. शनिवारी प्रेमिला रोहणकर मारल्या गेल्या.