...अखेर ती वाघीण जेरबंद; १५ दिवसांपूर्वी गुराख्याला केले होते ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 01:09 PM2022-02-14T13:09:06+5:302022-02-14T13:14:51+5:30
मुधोली नियम क्षेत्रातील मुधोली, सावरी, कोंडेगाव, सीताराम पेठ, मोहुली परिसरात वाघिणीने दहशत पसरवली होती.
भद्रावती (चंद्रपूर) : तालुक्यातील मुधोली नियत क्षेत्रातील कोंडेगाव परिसरात मागील सहा महिन्यांपासून दहशत पसरविणाऱ्या वाघिणीला शनिवारी वन विभागाने रेस्क्यू करून जेरबंद केले.
मुधोली नियम क्षेत्रातील मुधोली, सावरी, कोंडेगाव, सीताराम पेठ, मोहुली परिसरात वाघिणीने दहशत पसरवली होती. परिसरातील शिवारात तसेच चराईसाठी गेलेल्या बकऱ्या व गुरांना या वाघिणीने आपले भक्ष्य बनविले होते. तसेच १५ दिवसांपूर्वी नमू धांडे या गुराख्याला ठार केले होते, तर दोघांना जखमी केले होते. त्यामुळे नागरिक भयभीत बनले होते. आमदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाला धारेवर धरले होते. शनिवारी मुधोली क्षेत्रातील कोंडेगावजवळ वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करून सायंकाळी पाच वाजता वाघिणीला बेशुद्ध केले. त्यानंतर टीटीसी चंद्रपूर येथे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आले.
ही मोहीम क्षेत्र संचालक डॉ़. जितेंद्र रामगावकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पोडवलकर, उपसंचालक गुरुप्रसाद, क्षेत्र सहायक आर. जी. मून, एम. डी. मल्लेवार, वनरक्षक एम. ए. मंगाम, वी. के. जनबंधू यांनी केली.