उन्हाची भीती बाळगून ताडोबा सफरीला आलेल्या पर्यटकांना बसला पावसाचा तडाखा
By राजेश भोजेकर | Published: June 8, 2023 05:48 PM2023-06-08T17:48:35+5:302023-06-08T17:49:01+5:30
बुधवारी सकाळी वातावरण निरभ्र होते. सूर्य आग ओकत होता. दुपारच्या सफरीत उन्हाचा सामना कसा करायचा या विवंचनेत पर्यटक ताडोबाच्या मोहर्ली गेट परिसरात पोहचले.
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुधवारी दुपारी सफारीला आलेल्या पर्यटकांना जोरदार मुसळधार पावसाचा तडाखा बसला. ऐन सफरीच्या वेळेत वादळ वाऱ्यासह पावसाने धो-धो हजेरी लावल्याने अनेकांना आपली सफारी रद्द करावी लागली. काहींनी सफारी रद्दचा फटका जिप्सीमालकांना बसू नये म्हणून नाममात्र सफारी केली.
बुधवारी सकाळी वातावरण निरभ्र होते. सूर्य आग ओकत होता. दुपारच्या सफरीत उन्हाचा सामना कसा करायचा या विवंचनेत पर्यटक ताडोबाच्या मोहर्ली गेट परिसरात पोहचले. सफारीसाठी जिप्सी देखील सज्ज होत्या. दुपारी 3 वाजताच अचानक वादळ वारा सुटला. काहीही कळायच्या आत धो-धो पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पावसाने तुफान बॅटिंग केली. आता सफारी करूनही काहीही उपयोग होणार नाही म्हणून बहुतेक पर्यटकांनी सफारी नाकारली तर काहींनी जिप्सी मालकांचे नुकसान होऊ नये म्हणून नाममात्र सफारी केल्याची माहिती एका पर्यटकांने लोकमतला दिली. पावसामुळे अनेक झाडेही कोसळल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांनी सफारी केली त्यांना एकही प्राणी दिसला नाही, असेही ते म्हणाले.