ग्रामस्थांनी बघितला वाघांच्या झुंजीचा थरार, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर
By राजेश भोजेकर | Published: November 14, 2023 05:05 PM2023-11-14T17:05:32+5:302023-11-14T17:09:15+5:30
ही थरारक झुंजीची घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वाहानगावचे शेतकरी सुभाष दोडके यांच्या शेतात घडली.
चंद्रपूर :वाघांची झुंज ऐकली आहे. मात्र ती ग्रामस्थांनी प्रत्यक्ष बघितली. दोन वाघांमध्ये अस्तित्वासाठी झालेल्या या झुंजीत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीररित्या जखमी झाली. जखमी वाघजवळच एका झुंडुपात बसून आहे. त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी ‘लोकमत’ला दिली. ही थरारक झुंजीची घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वाहानगावचे शेतकरी सुभाष दोडके यांच्या शेतात घडली.
वाहानगाव हे चिमूर तालुक्यात ताडोबाच्या बफरमधील खडसंगी वनपरिक्षेत्रात जंगलालगत आहे. गावाचा शिवारही जंगलालाच लागून आहे. काही गावकरी शेतात गेले असता त्यांना दोन वाघांमध्ये जोरदार झुंज सुरू असल्याचे बघायला मिळाले.
झुंजीचे हे थरारक दृश्य बघून गावकऱ्यांनी ही वार्ता गावकऱ्यांना देण्यासाठी धाव घेतली. यानंतर गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळाकडे धावत आले. बघते तर झुंज संपली होती. आणि झुंजीतील एक वाघ रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेला होता. तर दुसरा वाघही रक्तबंबाळ होऊन जवळच एका झुंडुपात बसलेला होता. अधिक निरीक्षण केले असता जमिनीवर पडलेला वाघ या झुंजीत ठार झाला होता. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. मृत व जखमी वाघाला बघण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. मृत पावलेला वाघ हा नर असून तो सुमारे सात वर्षे वयाचा असल्याचा अंदाज आहे.