‘ती’ अट वगळल्याने पोलिस पाटील बनण्याचा मार्ग झाला सुकर; १० जुलै रोजी लागणार अंतिम निकाल
By साईनाथ कुचनकार | Published: June 5, 2023 07:06 PM2023-06-05T19:06:18+5:302023-06-05T19:06:36+5:30
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील रिक्त झालेले पोलिस पाटील पद भरण्यात येणार आहे.
चंद्रपूर : उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील रिक्त झालेले पोलिस पाटील पद भरण्यात येणार आहे. मात्र, यासंदर्भातील जाहीरनाम्यात पात्रतेमध्ये उमेदवाराची त्या गावात जमीन किंवा स्थावर मालमत्ता असावी, अशी अट लादण्यात आली होती. परिणामी इच्छा असूनही अनेकांना यामुळे पोलिस पाटील पदासाठी अर्ज भरता येत नव्हता. मात्र, यामध्ये आता बदल करीत उमेदवार त्याच गावाचा स्थानिक रहिवासी असावा, यासाठी तलाठी व ग्रामसेवकांचा संयुक्त दाखला अर्जासोबत जोडावा, असा बदल करण्यात आल्याने आता उमेदवारांनी पोलिस पाटील बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यासंदर्भात पोलिस पाटील निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपूर यांनी पत्रक काढले आहे.
पोलिस पाटील पदाकरिता उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय २५ ते ४५ असावे. सुदृढ शरीरयष्टी असावी. उमेदवार स्थानिक रहिवासी असावा, अशा अटी आहेत. मालमत्तेसंदर्भातील अट रद्द केल्यामुळे काही उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.
या गावात होणार पदभरती
नकोडा, पांढरकवडा, बोर्डा ( इंदा), डोनी, झरी, जांभरला अडेगाव, चक बोर्डा, महादवाडी, धानोरा, पिपरी, वढा, शेनगांव, सिदूर, शिवनीचोर, गोंडसावरी, ताडाळी, वढोली, नागाळा(म), लोहारा, चक वायगाव, देवाडा, चोराळा.
अशी राहील प्रक्रिया
१५ जूनपर्यंत अर्ज स्वीकारणे, १७ ते २१ जूनपर्यंत प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना परीक्षेकरिता प्रवेशपत्र देण्यात येणार आहे. २५ ला लेखी परीक्षा सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत. २७ जून रोजी लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २९ जून ते २ जुलैपर्यंत लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मौखिक परीक्षेकरिता उपस्थित राहण्यास पत्र देण्यात येणार असून ५ जुलै रोजी मुलाखत आणि १० जुलै रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.