पतीने केलेला शस्त्राचा वार पत्नीने चुकवला अन् पतीचाच गळा चिरला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 04:04 PM2024-07-19T16:04:48+5:302024-07-19T16:07:17+5:30
बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथील घटना ; एका क्षणात संसार ३ उद्ध्वस्त, मुले पोरकी
लोकमत न्यूज नेटवर्क
विसापूर : पतीला दारूचे व्यसन होते. दारूच्या व्यसनामुळे घर बरबाद होऊ लागले. यामुळे पती-पत्नीत नेहमी भांडण होत होते. बुधवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास दोघात कडाक्याचे भांडण झाले. पतीने टोकाचा निर्णय घेत धारदार शस्त्राने तिच्यावर वार केला. तिने तो चुकवत त्याच्या हातातील शस्त्र घेऊन रागाच्या भरात पतीचा गळा चिरला व त्याची निघृण हत्या केली. ही मन सुन्न करणारी घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथे घडली.
मृत पतीचे नाव अमोल मंगल पोडे (३८) रा. नांदगाव (पोडे), ता. बल्लारपूर असे आहे. घटनेतील आरोपी पत्नी लक्ष्मी अमोल पोडे (३५) हिला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता उघडकीस येताच घटनास्थळी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. मृत अमोल हा पत्नी लक्ष्मी व दोन मुले देवांश अमोल पोडे (११) आणि सारंग अमोल पोडे (८) सोबत राहत होता. मात्र
अमोलला दारू पिण्याचे व्यसन जडले. यामुळे पती-पत्नीत नेहमीच वाद होत होता. दारूच्या व्यसनावरून पत्नीची व दोन लहान मुलांची आबाळ होत होती. यामुळे पत्नी लक्ष्मी त्रस्त होती. नेहमीप्रमाणे बुधवारी अमोल घरी मद्यधुंद अवस्थेत आला. घरी आल्यावर त्याने पत्नी लक्ष्मीसोबत वाद घातला. उभयतांत कडाक्याचे भांडण झाले. पतीने धारदार शस्त्राने पत्नीवर वार केला. तिने तो चुकवत त्याच्या हातातील शस्त्र घेऊन रागाच्या भरात त्याच्या गळ्यावर वार केला. यामध्ये तो रक्तबंबाळ होऊन जागीच गतप्राण झाला. त्यांचे हे भांडण व त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहून मुले व लक्ष्मीची आई पार भेदरून गेले. जेव्हा लक्ष्मीला आपली चूक कळली तेव्हा तिने स्वतः फोन करून घटनेची माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व तिला अटक केली. या घटनेचा अधिक तपास चंद्रपूर शहर पोलिस करीत आहेत. पोलिसांनी लक्ष्मीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) १०३(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मुलांचे भविष्य आले सकटात
अमोल व लक्ष्मी पोडे यांच्या संसार वेलीवर दोन गोंडस मुले आली. तीच पती-पत्नीचा आधार होती. मात्र अमोलच्या दारूच्या व्यसनाने सुखी संसार उद्ध्वस्त झाला. अमोल व लक्ष्मीची मुले देवांश पोडे व सारंग पोडे कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेत होते. मात्र अमोलच्या दारूच्या व्यसनामुळे खर्च परवडत नव्हता. त्यामुळे अर्मालने सहा दिवसांपूर्वी नांदगाव (पोडे) येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत देवांशला सहाव्या तर सारंगला तिसऱ्या वर्गात प्रवेश घेतला. लक्ष्मीच्या हातून पतीची हत्या झाल्याने दोन्ही शालेय मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे.