२९.९७ लाखांच्या बंधाऱ्याचं काम फक्त दहा दिवसांतच झाले पूर्ण !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 01:51 PM2024-07-15T13:51:54+5:302024-07-15T13:53:01+5:30
Chandrapur : तक्रारींनंतर अधिकाऱ्यांची झोप उडाली; मंत्र्यांनी अधिवेशनात उपस्थित केला प्रश्न
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे २९.९७ लाख रुपये खर्चुन दहा दिवसांत बंधारा बांधण्यात आला. एवढेच नाही तर अधिकाऱ्यांनी कार्यारंभ आदेशही देऊन टाकला. या बंधाऱ्याच्या गैरव्यवहाराबाबत अधिवेशनादरम्यान आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील नाही तर विभागीय अधिकाऱ्यांनाही चांगलाच घाम फुटला आहे.
या विभागाचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी लेखी उत्तरात २९.९७ लाखांचा दहा दिवसांत बंधारा बांधल्याचे खरे असल्याचे लेखी उत्तरात मान्य केले आहे. या बंधाऱ्याची तांत्रिक तपासणी प्रक्रिया सुरू असून अंतिम अहवाल प्रलंबित असल्याचेही सांगितले. त्यामुळे या बंधाऱ्यात अडकलेल्या अनेकांचे सध्या धाबे दणाणले आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग चंद्रपूर यांनी पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे नाला बंधारा बांधकामासाठी निविदा काढली. ही निविदा माँ जयदुर्गा मजूर सहकारी संस्था मर्यादित राजुरा, या संस्थेला २९.९७ लाख रुपयांमध्ये मंजूर करून २१ मार्च २०२३ ला कार्यारंभ आदेश काढण्यात आला. बंधारा बांधकाम करण्याचा कालावधी तीन महिन्यांचा असतानाही अवघ्या १० दिवसांत काम पूर्ण करण्यात आले.
चंद्रपूर समितीमध्ये तीन अधिकारी
नागपूर येथील समितीने चौकशी करण्यापूर्वी चंद्रपूर येथील समितीने तपासणी केली. या समितीमध्ये जिल्हा परिषद मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि तीन सदस्य होते. त्यांनी प्राथमिक अहवाल तयार करून टेक्निकल अहवालासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ज्ञ समितीला पाचारण केले. मात्र अभियांत्रिकीच्या समितीने अद्यापही अहवाल सादर केला नसल्याची माहिती मिळाली आहे.
'लोकमत'ने वेधले होते लक्ष
या बंधाऱ्याबाबत ५ ऑगस्ट २०२३ रोजी लोकमतने 'अहो आश्चर्य... २९.९७ लाखांच्या बंधाऱ्याचे काम अवघ्या दहा दिवसात' या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात अहवाल मागितला होता. चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली.
चौकशीचे केवळ सोपस्कार, नागरिकांचा आरोप
■ या बंधाऱ्याच्या तपासणीसाठी नागपूर येथील एका समितीने २२ जून २०२४ रोजी तपासणी केली. मात्र ही तपासणी थातूरमातूर असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी समितीचा प्रयत्न असल्याचेही काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
■ बांधकामाची तपासणी जलसंधारणच्या निक- षानुसार करणे अपेक्षित असतानाही नागपूर येथील समितीने बांधकामाच्या दर्जाची तपासणी अत्याधुनिक यंत्राद्वारे केली नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
उमरी पोतदार येथील बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. कामामध्येही अनियमितता आहे. यासंदर्भात अधिवेशनादरम्यान, प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नाही. याबाबत पुढील अधिवेशनामध्येही प्रश्न उपस्थित केला जाईल. दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवू.
- सुधाकर अडबाले, आमदार