जलजीवन मिशनचेही काम दीड वर्षापासून अर्धवट; नागरिकांमध्ये तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 02:06 PM2024-12-02T14:06:32+5:302024-12-02T14:08:47+5:30

जुनी नळयोजना ठप्प : नागरिकांत तीव्र संताप, काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

The work of Jaljeevan Mission has also been incomplete for one and a half years; Intense anger among citizens | जलजीवन मिशनचेही काम दीड वर्षापासून अर्धवट; नागरिकांमध्ये तीव्र संताप

The work of Jaljeevan Mission has also been incomplete for one and a half years; Intense anger among citizens

दीपक साबने 
लोकमत न्यूज नेटवर्क 
जिवती :
दोन वर्षांपूर्वी जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत ग्रामपंचायत येल्लापूर येथे नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा अनियमित का होईना पण सुरू होता. सर्वांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्याच्या उदात्त हेतूने शासनाच्या जलजीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत तालुक्यातील येल्लापूर येथे काम मंजूर झाले व कामास सुरुवातही करण्यात आली. तेव्हा अस्तित्वात असलेली गावातील जुनी जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत नळयोजनेसाठी केलेली पाइपलाइनही उद्ध्वस्त केली. आता नवीन जलजीवन मिशनचे कामही जवळपास दीड वर्षापासून ठप्प आहे. त्यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.


परिणामी गावातील नागरिकांसह दिव्यांग, वयोवृद्ध, दीर्घ आजार असणाऱ्या कुटुंबांतील सदस्यांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव चित्र आहे. ग्रामपंचायत येल्लापूर येथे जवळपास अडीच हजार लोकसंख्या आहे. येथे पाच हातपंप, सहा विहिरी आहेत. सध्या जवळपास सर्वच पाण्याच्या स्रोतात पाणी मुबलक आहे. जिल्हा परिषद शाळेजवळील व गावालगत असलेली पिण्याच्या पाण्याची विहीर ढासळून दोन वर्षांचा कालावधी लोटला, तरी प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. या विहिरीवरून पाणी भरताना दुर्दैवी घटना घडण्याची दाट शक्यता आहे. सध्या येल्लापूरवासीय तलावाखाली असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवरून बैलबंडी, ऑटो, सायकल व दुचाकीच्या साहाय्याने पाणी आणतात. ज्यांच्याकडे वरील साधने नाहीत, त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते व जे दूरवर पायपीट करू शकत नाही, त्यांना एक माठ पाण्याचे १५० ते २०० रुपये मोजावे लागतात. 


विशेष म्हणजे, गावात अशी काही कुटुंबे आहेत, त्यांच्या घरी पाणी आणण्यासाठी कोणीही नाहीत. दिव्यांग व्यक्तींनाही त्यांच्या तीनचाकी सायकलवर पाणी आणण्याची वेळ आली आहे. सुपारी आत्राम हा दिव्यांग पाणी आणण्यासाठी दररोज आपल्या नातेवाइकांना सोबत घेऊन आपल्या तीन चाकी सायकलवरून पाणी आणतो. दीड वर्षापासून अर्धवट असलेल्या जलजीवनच्या कामामुळे वरील त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. 


शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती 
गावात सर्व शेतकरीवर्ग असल्याने सध्या शेतकरी कुटुंबातील सर्वच सदस्य शेतीच्या कामात व्यस्त आहेत. सकाळी उठून पाणी आणण्यासाठी जास्तीचा वेळ वाया जातो. याचा परिणाम शेती कामावर होताना दिसून येत आहे.


"जलजीवनचे अर्धवट काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, या गंभीर समस्येची प्रशासनाने दखल घेतली नाही. संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष देऊन दीड वर्षापासून अर्धवट राहिलेल्या जलजीवन मिशनचे काम त्वरित पूर्ण करावे आणि गावातील नागरिकांना नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करावा. अन्यथा नाइलाजाने आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल." 
- प्रशांत कांबळे, सदस्य ग्रामपंचायत तथा सामाजिक कार्यकर्ता.

Web Title: The work of Jaljeevan Mission has also been incomplete for one and a half years; Intense anger among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.