ग्रामस्थांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळा कायमची बंद होण्यापासून वाचली...
By साईनाथ कुचनकार | Published: May 4, 2023 04:08 PM2023-05-04T16:08:16+5:302023-05-04T16:09:17+5:30
पटसंख्या वाढली, पाचवीला ३५ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
साईनाथ कुचनकार, चंद्रपूर : मागील शैक्षणिक सत्रात पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून येथून जवळच असलेले विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल बंद करण्याचा फतवा जिल्हा परिषद प्रशासनाने काढला होता. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून शाळा बंद न करण्यासाठी आंदोलन केले होते. चालू शैक्षणिक सत्रात विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत जोरदार प्रयत्न केले. दरम्यान, पाचवीच्या वर्गात तब्बल ३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पटसंख्या वाढल्यामुळे येथील शाळा बंद होण्यापासून वाचली.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मागील शैक्षणिक सत्रात वर्ग पाचवी ते दहावीत केवळ २२ विद्यार्थी शैक्षणिक धडे गिरवत होते. त्यामुळे अर्धे शैक्षणिक सत्र झाल्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने शाळा बंद करण्याचा फतवा काढला. त्याला ग्रामस्थांनी विरोध केला तसेच जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. जिल्हा परिषद हायस्कूलमधील पटसंख्या वाढविण्याची संधी मागितली. तेव्हापासून ग्रामपंचायतीमार्फत ज्यांचे पाल्य चौथ्या वर्गात होते, त्या पालकांची पालक सभा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती विभाग व टेकडी विभागात घेतली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पालकांचे समुपदेशन केले. जिल्हा परिषद हायस्कूल नियमित सुरू राहिले पाहिजे, या संदर्भात मार्गदर्शन केले. त्याला गावातूनही चांगला प्रतिसाद मिळाला.
जिल्हा परिषद हायस्कूल, विसापूरमधील पटसंख्या वाढविण्यासाठी सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, सुरज टोमटे, हर्षला टोंगे, वैशाली पुणेकर, गजानन पाटणकर, सुनील रोंगे, प्रदीप गेडाम, दिलदार जयकर, सुरेखा इटणकर, विद्या देवाळकर आदींचे प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत.
या विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
सैनिक स्कूलमधील मयंक रवींद्र कांबळे याने वर्ग सहावी, बल्लारपूर जनता विद्यालयातील आर्यन मच्छिंद्र कुळमेथे याने वर्ग आठवी, बल्लारपूर दिलासाग्राम कॉन्व्हेंटमधील वेदांत दिनकर डाहुले याने वर्ग आठवी, पटेल हायस्कूल, चंद्रपूरमधील सम्यक सुनील पुणेकर याने वर्ग सहावीमध्ये प्रवेश घेऊन शिक्षकांचा आत्मविश्वास वाढविला. आता विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षण आवडत असल्याने पालकदेखील आपल्या पाल्यांचा प्रवेश घेत आहेत.