...तर ताडोबातील वाघाचा गुदमरेल श्वास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:00 AM2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:01:14+5:30
सरकारने ज्या ४१ कोळसा ब्लॉकला लिलावासाठी मंजुरी दिली आहे. त्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कोळसा ब्लॉकचा समावेश आहे. हा परिसर वन्यजीवांसाठी संवेदनशील समजला जातो. कारण याच मार्गाने वर्धा येथील बोर व्याघ्र प्रकल्प आणि अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प लागतो. त्यामुळे वाघांचे स्थलांतर होऊ शकते. याला कॉरिडॉर म्हटले जाते. वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी तो अत्यंत महत्त्वाचा असतो.
राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : जग विख्यात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पापासून हाकेवर असलेल्या बंदर (शिवापूर) गावात बंदर कोल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कोळसा ब्लॉकला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्याचा लिलाव करण्याच्या हालचाली केंद्र स्तरावर सुरू झाल्या आहेत. जर येथे कोळसा खाण सुरू झाली, तर ताडोबातील वाघांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. बंदर ते शेडेगाव, अमरपुरी, मजरा हा परिसर कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. या मार्गानेच वाघ इतर व्याघ्रप्रकल्पात स्थलांतर करू शकतात. जर कोळसा खाण सुरू झाली तर वाघांचा भ्रमंती मार्ग उद्ध्वस्त होऊन वाघांच्या भ्रमंतीवर पायबंद बसून वाघाचा श्वास गुदमरेल व वन्यजीव मानव संघर्ष वाढण्याचा धोका वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.
सरकारने ज्या ४१ कोळसा ब्लॉकला लिलावासाठी मंजुरी दिली आहे. त्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कोळसा ब्लॉकचा समावेश आहे. हा परिसर वन्यजीवांसाठी संवेदनशील समजला जातो. कारण याच मार्गाने वर्धा येथील बोर व्याघ्र प्रकल्प आणि अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प लागतो. त्यामुळे वाघांचे स्थलांतर होऊ शकते. याला कॉरिडॉर म्हटले जाते. वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी तो अत्यंत महत्त्वाचा असतो.
ताडोबातील उत्तर दिशेला असलेला हा परिसर अरुंद आहे. त्यातही कोळसा खाणीला मंजुरी दिली तर उत्तरेकडील ताडोबा क्षेत्रातील वन्यजीवांचे स्थलांतर पूर्णपणे थांबून जाणार आहे. अशावेळी मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचणार आहे.
आधीच ताडोबात वाघांच्या वाढत्या संख्येने ही परिस्थिती ओढविली आहे. जिल्यात एका वर्षात २४ जणांना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे त्यात चिमूर तालुक्यातीलच पाच महिन्यात पाच जणांचा समावेश आहे. पुढे ही परिस्थिती आणखी स्फोटक होणार आहे.
त्यामुळे आता केंद्राने जाहीर केलेल्या बंदर कोळसा ब्लॉकला जर कोळसा उत्खननासाठी मंजुरी दिली, तर संख्येत वाढ झालेल्या वाघात अधिवासासाठी आपसात संघर्ष निर्माण होईल. त्यात अनेक वाघांचा जीव जाईल. मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचेल, प्रजननावर मर्यादा येईल. त्यामुळे त्यांच्यात अनेक विकार निर्माण होतील. जर असे झाले, तर ही अत्यंत धोकादायक स्थिती असेल. वाघ हा अन्नसाखळीतील सर्वोच्च प्राणी आहे. जंगलाचा तो केंद्रबिंदू आहे. जर वाघ संपला तर पर्यावरणाच्या असंतुलनाची फळे मानवाला भोगावे लागतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आताच यावर गांभीर्याने विचार करून शासनाला त्या दृष्टीने पावले उचलावी लागणार आहे.
या गावांचे हरवेल गावपण
चिमूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ५ ते १० किमी अंतरावरील बंदर (शिवापूर), शेडेगाव, मजरा (बेगडे), अमरपुरी व गदगाव या पाच गावांत बंदर कोल कंपनी प्रा, लिमिटेडची कोळसा खाण सुरू करण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या खणीमुळे गावाच्या शेजारी कोळसा काढल्यानंतर मातीचे मोठमोठे ढिगारे तयार होऊन या पाच गावांचे गावपण हरपणार आहे. मात्र स्थानिकांना रोजगार मिळण्याची शक्यता कमीच आहे.
ताडोबातील येडाअण्णा व करांडलातील ‘जय’ चे स्थलांतर
एकेकाळी मोहर्ली परिसरात अधिराज्य गाजवणारा येडाअण्णा आपल्या उतरत्या वयात आपले एकेकाळचे क्षेत्र बदलवून चिमूर तालुक्यातील अमरपुरी (भांसुली) या जंगलात येऊन तळ्याच्या पाळीवर मृत झाला तर करांडला येथील जय नावाचा वाघ स्थलांतर करून कुठे गेला हे अजूनही कळले नाही. त्यामुळे वाघांची व इतरही प्राण्यांची भ्रमंती गरजेची आहे.
चिमूर तालुक्यातील बंदर, खडसंगी, शेडेगाव हा सर्व ग्रीन बेल्ट आहे. यामधून वाघांचे व इतरही प्राण्यांच्या जाण्यायेण्याचा मार्ग आहे. या खणीमुळे प्राण्यांचा हा मार्ग उद्ध्वस्त होऊन परिसरात प्रदूषण वाढेल. तेव्हा ही खाण न होणेच सर्वांच्या फायद्याचे आहे.
-मनीष नाईक, सचिव, ट्री फाऊंडेशन चिमूर.
या ब्लॉकमध्ये बंदर व शिवापूर येथील शेतकऱ्यांच्या शेती आहेत. या शेतीमध्ये प्रदूषण होऊन शेतीचे नुकसान होईल. तसेच स्थानिक नागरिकांना काही लाभ होणार नाही. तसेच वाघासह इतर प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे ही खाण मानव व प्राण्यांसाठी नुकसानकारक ठरणार.
-बंडू तराळे, माजी सरपंच, ग्रामपंचायत बंदर.