...तर पेट्रोलपेक्षाही महाग होईल पाणी, पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:43+5:302021-07-15T04:20:43+5:30
चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र मागील काही दिवसांत चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे जुन्या पाणीपुरवठा योजनेवर ...
चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र मागील काही दिवसांत चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे जुन्या पाणीपुरवठा योजनेवर ताण पडत आहे. त्यामुळे आता नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेला आणखी किती दिवस लागणार, याबाबत संभ्रम आहे. शहरातील सर्व भागांत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांनी आपल्या सोयीनुसार बोअरवेल खोदले आहेत. यासाठी पाणी लागत नसल्याने ३०० ते साडेतीनशे फुटांपर्यंतही काहींनी बोअरवेल मारून भूगर्भातील पाणी उपसा सुरू केला आहे. बोअरवेल मारताना महापालिका तसेच भूजल विभागाची परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र मनपा तसेच संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे कुठलीही परवानगी न घेता शहरात वाट्टेल तिथे बोअरवेल मारले जात आहेत. सिमेंटीकरणामुळे पाणी मुरत नाही तर दुसरीकडे उपसा मोठ्या प्रमाणात केला जात असल्यामुळे भविष्यात चंद्रपूर शहरात पाण्यासाठी विदारक स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून पेट्रोलपेक्षाही पाणी महाई होणार आहे.
बाॅक्स
कोणीही यावे अन् बोअरवेल खोदावे?
चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक जण घर बांधून स्वत: पाण्याची सोय करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे परवानगी न घेता बोअरवेल मारत आहेत. विशेष म्हणजे, घर बांधण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली जात असली तरी बोअरवेल मारताना कुठलीही परवानगी घेतलीच जात नसल्याचे चित्र आहे. याकडे अधिकाऱ्यांसह पदाधिकारीही दुर्लक्ष करीत आहेत.
बाॅक्स
रेनवाॅटर हार्व्हेस्टिंग कागदावरच
पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी रेनवाॅटर हार्व्हेस्टिंग करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने योजनाही जाहीर केली आहे. मात्र योग्य नियोजन न केल्यामुळे नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. विशेष म्हणजे, शासकीय कार्यालयामध्ये रेनवाॅटर हार्व्हेस्टिंग अनिवार्य असतानाही शहरातील अनेक कार्यालयात ही सोयच नसल्याचे बघायला मिळत आहे.
बाॅक्स
दिवसाआड पाणीपुरवठा
महापालिकेद्वारे शहरात पाणीपुरवठा केला जातो. मात्र दिवसाआड आणि अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिक आपल्या सोयीनुसार बोअरवेल, ट्यूबवेल तसेच विहिरीद्वारे पाण्याची सोय करीत आहेत. परिणामी भूगर्भातील पाणीसाठा कमी होत आहे.
कोट
भूगर्भातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी कमी होत आहे. याचा परिणामी येत्या काही वर्षांतच जाणवेल. प्रत्येकाने रेनवाॅटर हार्व्हेस्टिंग करणे गरजेचे आहे. महापालिकेनेही यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे;. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भविष्यात पाणी समस्या उग्र रूप धारण करण्यापूर्वी वेळीच नियोजन करणे अत्यावश्यक आहे.
-संजय वैद्य
जिल्हा संयोजक
जलबिरादरी
बाॅक्स
१
दिवसाआड नळाद्वारे पाणी
५५४०
शहरातील एकूण बोअरवेल
३,७५,०००
शहराची एकूण लोकसंख्या
२५०
लिटर प्रतिकुटुंब पाणी