चंद्रपुरात उभे आहेत ५५ अनधिकृत टॉवर्स !
By admin | Published: July 9, 2014 11:22 PM2014-07-09T23:22:23+5:302014-07-09T23:22:23+5:30
रिलायन्स जीओ या कंपनीला शहरात शंभर टॉवर उभारण्यासाठी दिलेल्या परवानगीवरुन वादंग माजले असतानाच मागील दोन वर्षांपासून शहरात तब्बल ५५ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल टॉवर
चंद्रपूर : रिलायन्स जीओ या कंपनीला शहरात शंभर टॉवर उभारण्यासाठी दिलेल्या परवानगीवरुन वादंग माजले असतानाच मागील दोन वर्षांपासून शहरात तब्बल ५५ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल टॉवर विनापरवानगीने उभे असल्याची बाब समोर आली आहे. यात मनपाचे तब्बल २७ लाख रुपपयांचे नुकसान झाले आहे. रिलायन्सवरुन वादळ निर्माण झाल्यानंतर आता मनपाने या टॉवरवर कारवाई करण्याची तयारी चालविली आहे.
मागील महिन्याभरापासून महानगरपालिकेत रिलायन्स जीओ या कंपनीला टॉवर उभारण्यासाठी दिलेल्या परवानगीवरुन मनपा पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. शहरात शंभर टॉवर उभारण्याच्या ठरावाला भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध केला आहे. रेडिएशन्समुळे मानवी आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होईल, असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. दरम्यान, चंद्रपूर आरोग्य संघर्ष समिती, ज्येष्ठ नागरिक संघ आणि काँग्रेसने चंद्रपूर बंद करुन या टॉवर उभारणीला विरोध दर्शविला आहे. रिलायन्सला परवानगी देताना मोठा आर्थिक व्यवहार झाला, असेही आरोप होत आहे. टॉवरवरुन वादळ उठले असतानाच आता शहरात एकूण ८४ टॉवरपैकी ५५ टॉवर अनधिकृत असल्याची बाब समोर आली आहे. नगरपालिका असताना ते शहरात लावण्यात आले. तत्कालीन बांधकाम सभापतींनी या टॉवरविरोधात मोहिम हाती घेतली होती. मात्र, राजकीय दबावामुळे ही कारवाई थंडबस्त्यात गेली. त्यानंतर मनपाची निर्मिती झाली. तेव्हाही या टॉवरविषयी एकाही पदाधिकाऱ्याने वाच्यता केली नाही. सगळे शांत होते.
विशेष असे की, टॉवर उभारताना नगरपालिका, मनपाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. उभारणी शुल्क म्हणून संबंधित कंपनीला २५ हजार रुपये स्थानिक स्वराज्य संस्थेत जमा करावे लागतात. मात्र, या ५५ टॉवरपैकी एकानेही शुल्क जमा केले नाही. परवानगी घेतली नाही. तेव्हा पालिकेचे जवळपास २७ लाख रुपयांचे नुकसान झाले. मनपा झाल्यानंतर आता हा दर प्रतिटॉवर एक लाख ३० हजार रुपये असा झाला. मनपाने कारवाई केली तर त्यांच्या उत्पन्नात ७१ लाख ५० हजार रुपयांची भर पडू शकते. मात्र, दोन वर्षांपर्यंत मनपाच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रकार दिसला नाही. रिलायन्सच्या मुद्द्यावरुन आरोपांचा धुरळा उडाल्यानंतर त्यांना शहरातील अनधिकृत टॉवर दिसायला लागले आहेत. सोमवारी रिलायन्सने परवानगी न घेता श्रद्धानगर परिसरात टॉवर उभारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला नगरसेवकांसह नागरिकांनी विरोध केला. मात्र दोन वर्षापासून मनपाच्या परवानगिशिवाय उभ्या असलेल्या टॉवरकडे कुणाचे लक्ष गेले नाही. यातही धक्कादायक बाब अशी, मनपातील एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाकडेही अनधिकृतरित्या टॉवर उभे केले आहे. दरम्यान, स्थायी समितीचे सभापती रामू तिवारी यांनी आयुक्त सुधीर शंभरकर यांना पत्र दिले आहे. या टॉवरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)