कालवे आहेत; पाणी नाही

By admin | Published: November 8, 2015 01:17 AM2015-11-08T01:17:39+5:302015-11-08T01:17:39+5:30

शेतपिकाला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशातून गोसेखूर्द प्रकल्प, बाघोली बुटी उपसा सिंचन योजनेंतर्गत सावली तालुक्यात कालवे तयार करण्यात आले आहेत.

There are canals; No water | कालवे आहेत; पाणी नाही

कालवे आहेत; पाणी नाही

Next

शेतकरी चिंताग्रस्त : सावली तालुक्यातील धानपीक करपले
चंद्रपूर : शेतपिकाला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशातून गोसेखूर्द प्रकल्प, बाघोली बुटी उपसा सिंचन योजनेंतर्गत सावली तालुक्यात कालवे तयार करण्यात आले आहेत. यावर्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावातून सोडण्यात आले. मात्र, पाण्याचा प्रवाह कमी दाबाचा असल्याने आणि वाघोली बुटी योजनेच्या नहारातून पाणी येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानपीक करपले आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
हंगामाच्या सुरुवातीला पावसाने उशिरा हजेरी लावली. तसेच अपुऱ्या पावसाने डोंगराव येथील तलावात पुरेसे पाणी झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील बोरमाळा, डोंगरगाव, चिखली, विहीरगाव, कसरगाव, गेवरा खुर्द, सायखेडा आदी गावातील अनेक शेतकरी पऱ्हे टाकू शकले नसल्याने जमीन पडीक आहे. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली. त्यांना धानपीक कसे वाचवायचे, असा प्रश्न उभा ठाकला होता. गोसेखुर्द धरणाचे पाणी आसोलामेंढा तलावात सोडून अनेक वर्षाची शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्ण करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होऊ लागला. मात्र पालेबारसा येथील कालव्याला भगदाड पडल्याने पाणी वाया गेले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. तसेच जनकापूर, सायखेडा ते बोरमाळा गावापर्यंत जाणारा गोसेखुर्द प्रकल्पाच्या नहराचे काम तीन वर्षांपासून पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी नहराचे काम पूर्ण करुन पाणी देण्याची मागणी केली.
परंतु शेतकऱ्यांच्या मागणीकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याने दरवर्षीच त्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. ज्या शेतकऱ्यांची शेती कालव्याला लागून आहे. त्या शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळत आहे. परंतु ज्यांना दोन-तीन शेतकऱ्यांचे शेत ओलांडून पाणी न्यावे लागते. कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचले नाही. जांब (बु.) येथील खुशाल लोडे या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा नसल्याने त्यांना दरवर्षीच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळी तोंडावर आली. हातात पुरेसे पीक आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. पाण्याअभावी संपूर्ण धान पीक करपले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाने नुकसान झालेल्या शेतीचा तातडीने पंचनामा करुन आर्थिक मदत द्यावी, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: There are canals; No water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.