Coronavirus positive story; असेही डॉक्टर आहेत..! कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना डिपाॅझिट केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 09:49 AM2021-05-14T09:49:58+5:302021-05-14T09:50:21+5:30
Chandrapur news कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर हॉस्पीटलचे बिल देण्यासाठी कुटुंबियांकडे पुरेसे पैसे नसल्याचे पाहून डॉक्टरांनी शुल्क केले माफ. चंद्रपूर येथील वैद्यक क्षेत्राने दिला वस्तुपाठ.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांकडून डाॅक्टर लूट करीत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाने चंद्रपूर शहरातील काही डाॅक्टरांना कारवाईची नोटीस बजावली असून एका कोरोना रुग्णालयाचा परवानाही रद्द केला आहे. एवढेच नाही तर डाॅक्टरांच्या बिलाचे ऑडिट करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली आहे. मात्र शहरातील आजही काही डाॅक्टरांनी सामाजिक भान जपले आहे. अशीच एक पोस्ट रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामध्ये डाॅक्टरांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केल्याचे बघायला मिळाले.
येथील डाॅ. चेतन खुटेमाटे यांच्या रुग्णालयाला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला असून यामध्ये डाॅ. सचिन धगडी हे रुग्णांवर उपचार करीत आहे. दरम्यान, रविवारी गावातील शेतकरी कुटुंबातील एका कोरोना बाधित रुग्ण उपचारादरम्यान दगावला. त्यानंतर त्या रुग्णाच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याची माहिती मिळताच डाॅ. खुटेमाटे तसेच डाॅ. सचिन धगडी यांनी कोणतेही शुल्क घेतले नाही. एवढेच नाही तर डिपाॅझिट ठेवलेली रक्कमही त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केली. यासंदर्भात त्या गावातील काही नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून डाॅक्टरांनी आजही माणुसकी जपली असल्याची पोस्ट व्हायरल केली. यानंतर ही पोस्ट दिवसभर सोशल मीडियावर सारखी व्हायरल झाली असून सर्वत्र कौतुक केले गेले.