निराधार योजनांचा गैरफायदा घेणारे बोगस लाभार्थीच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:25 AM2021-01-22T04:25:33+5:302021-01-22T04:25:33+5:30
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ६५ वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग ...
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ६५ वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यांसारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा (आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांसह), ३५ वर्षांवरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. २०२०च्या नोंदणीनुसार अशा लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात ६८ हजारपर्यंत पोहोचली आहे. काही महिन्यांपूर्वी बोगस लाभार्थी शोधमोहीम राबविण्यात आली होती. यात मूळ कागदपत्रांची तपासणी झाली. पण, बोगस लाभार्थी आढळले नाहीत, असा दावा प्रशासनाने केला आहे.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तिचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला एकरकमी २० हजारांचे अर्थसहाय्य दिले जाते. जिल्ह्यात ३,५०० लाभार्थ्यांची नोंद आहे.
संजय गांधी योजना (अनाथ )
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेत दिव्यांगांना मिळणाऱ्या पेन्शच्या रकमेत वाढ करण्यात आली. उत्पन्न मर्यादेत २१ हजारांवरून ५० हजार रुपये इतकी वाढ झाली.
संजय गांधी योजना (दिव्यांग )
४० ते ७९ टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तिंना प्रतिमहिना ८०० रुपये आणि ८० टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तिंना प्रतिमहिना एक हजार रुपये इतकी पेन्शन मिळते.
संजय गांधी योजना (घटस्फोटीत)
घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोटीत मात्र, पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिलांना दरमहा एक हजार देण्याची तरतूद आहे.
अर्थसहाय्य मिळण्यास विलंब ?
कोरोना काळापासून निराधार व्यक्तींच्या अडचणी वाढल्या. उदरनिर्वाह व औषधांसाठी लागणारा खर्च वेळेवर मिळत नसल्याने या दुर्बल घटकांची मोठी ससेहोलपट होते. बोगस लाभार्थी शोधमोहीम राबविलीच पाहिजे. मात्र, पात्र लाभार्थ्यांना तरी दरमहा अर्थसहाय्य देण्याकडे दुर्लक्ष करू नये, अशी अपेक्षा संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांनी लोकमतजवळ व्यक्त केली.
लाभार्थी कुठल्या याेजनेचे किती ?
संजय गांधी योजना ६८०००
इंदिरा गांधी योजना २९०००
दिव्यांग कल्याण ७३५०
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ३५०००