वाहनांना जाण्यासाठी जागाच नाही जनतेचा प्रश्न 'आम्ही जायचे तरी कुठून ?'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 05:21 PM2024-07-18T17:21:32+5:302024-07-18T17:26:44+5:30
Chandrapur : वेकोली परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर दुतर्फा ट्रकांच्या रांगाच रांगा
नितीन मुसळे
लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : वेकोली परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर दुतर्फा कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांच्या लांबच लांब रांगा लावण्यात येत असल्याने अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होऊन लहान वाहने जाण्यास रस्ताच राहत नाही. त्यामुळे साहेब, तुम्हीच सांगा आम्ही जायचे कुठून, असा सवाल करीत हा महामार्ग वेकोलीसाठी की जनतेसाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राजुरा-गोवरी-पोवनी-साखरी-वरोडा या वेकोली परिसरातून जाणाऱ्या मुख्य मार्गाचे महामार्गात रूपांतर करून नवीन बांधकाम करण्यात आले. या परिसरात वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत असलेल्या विविध कोळसा खाणीतून निघणाऱ्या कोळशाची वाहतूक या मार्गावरुन केली जाते. या मार्गावर चार ठिकाणी असलेल्या वेकोलीच्या चेकपोस्टसमोर खाणीत जाणाऱ्या ट्रकांच्या मोठ-मोठ्या रांगा रस्त्याच्या दुतर्फा लावल्या जात असून अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.
त्यामुळे या मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वेकोलीच्या या अवैध पार्किंगमुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. या संदर्भात अनेकवेळा तक्रारी केल्या गेल्या; परंतु वेकोली प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
महामार्ग वेकोलीसाठी की जनतेसाठी ?
महामार्ग झाल्यानंतर वेकोलीच्या कोळशाची वाहतूक करणाऱ्या शेकडो ट्रकांनी या महामार्गावर अतिक्रमण केले आहे. हे ट्रक रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या महामार्गावरून परिसरातील माथरा, गोयेगांव, गोवरी, चिचोली, पोवनी, कढोली, चार्ली, निर्ली, धिडशी, साखरी, वरोडा, पेल्लोरासह अनेक गावांतील नागरिक ये-जा करतात. त्यामुळे हा महामार्ग वेकोलीच्या कोळसा वाहतुकीसाठी केला की परिस- रातील नागरिकांसाठी असा प्रश्न केला जात आहे.
अवैध पार्किंग अपघातास कारणीभूत
वेकोलीच्या सास्ती, गोवरी, पोवनी व पोवनी २ या कोळसा खाणीच्या चेकपोस्टसमोर शेकडो ट्रकांच्या रांगा रस्त्याच्या दोन्ही कडेला लागत असल्याने रस्त्यावरून नागरिक, वेकोली कामगार, शालेय विद्यार्थी यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ट्रकांची ही अवैध पार्किंग अपघाताला कारणीभूत ठरत आहे. वर्षाकाठी करोडो रुपये नफा कमविणाऱ्या वेकोली प्रशासनाने गेल्या कित्येक वर्षांपासून पार्किंगची सोय केली नाही. पोवनी २ सब एरिया कार्यालयासमोर तसेच सर्व चेकपोस्टसमोर नेहमीच ट्रक उभे असतात. ही पार्किंग धोकादायक ठरत आहे.