बा शासना काय करू, एकीकडे पावसाची पाठ, तर दुसरीकडे वाघाची डरकाळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 05:18 PM2022-06-28T17:18:19+5:302022-06-28T18:14:57+5:30
मूल तालुक्यात पाऊस समाधानकारक नाही. त्यामुळे शेती कसण्यात अडचण येत आहे. असे असताना मात्र वाघाची डरकाळीदेखील शेतकऱ्यांना भयभीत करून सोडत आहे.
राजू गेडाम
मूल (चंद्रपूर) : शेतीचा हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्याची लगबग बघायला मिळत आहे. असे असताना वाघाची डरकाळी शेतकऱ्यांना भयभीत करताना दिसत आहे. असे असताना पावसानेदेखील पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी विवंचनेत दिसत आहेत. शेतात पाणी नाही आणि त्यातच वाघाचे शेतात बस्तान, त्यामुळे शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच आहे.
सध्या मूल तालुक्यातील बफर व नॉन बफर वनपरिक्षेत्रात १४ जणांचा वाघाने बळी घेतल्याने वाघाची दहशत आजही कायम असल्याची चर्चा गावात होताना दिसत आहे. त्यामुळे शेतीची रोवणी करण्यासाठी वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. शेतकऱ्याच्या शेतातील कामे झाली पाहिजेत. त्याचबरोबर शेतकरीदेखील सुरक्षित राहिला पाहिजे, यासाठी शासनाने नवीन मार्ग निवडणे गरजेचे झाले आहे.
वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग प्रयत्नरत असल्याने दिवसेंदिवस वाघाबरोबरच इतर वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. त्यामुळे वाघाला भ्रमण करण्यासाठी त्याचे क्षेत्र कमी पडायला लागले आहे. त्यामुळे आपले भक्ष्य शोधण्यासाठी तो गावाकडे आगेकूच करीत असल्याचे दिसून येते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गावात जवळच जंगल असल्याने वन्य प्राण्यांचा वावर दिसून येतो. मूल तालुक्यात पाऊस समाधानकारक नाही. त्यामुळे शेती कसण्यात अडचण येत आहे. असे असताना मात्र वाघाची डरकाळीदेखील शेतकऱ्यांना भयभीत करून सोडत आहे. शेतीदेखील जंगलालगत असल्याने मानव प्राणी संघर्षाच्या घटना सात्यत्याने घडून १४ जणांचा बळी गेला आहे.
हंगाम कसा करावा?
सध्या शेतीचा हंगाम असल्याने शेतकरी शेतात जात आहे. या हंगामात शेती पिकविणे आवश्यकच आहे. वर्षभरातील कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतात उत्पादन करणे गरजेचे आहे. मात्र, वाघाची दहशत शेतात निर्माण झाल्याने शेतीचा हंगाम कसा करावा, या विवंचनेत शेतकरी दिसत आहे. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील चिंचाळा, दहेगाव, मानकापूर व कवळपेठ परिसरातील गावात आजही वाघाचा वावर असून अनेकांना शिकारदेखील बनविण्यात आले आहे. तसेच बफर वनपरिक्षेत्रातील मारोडा, सोमनाथ ,डोनी, फुलझरी, करवन, काटवन, कोसंबी, रामपूर आदी गावांतील परिसरात वाघाबरोबरच इतर हिंस्र पशूची दहशत कायम आहे.
फिनिशिंग जाळीने जंगल प्रतिबंधित करावे
यावर उपाययोजना म्हणून मागील शेतीच्या हंगामात वनविभागाने नॉन बफरपरिक्षेत्रात जंगलक्षेत्र फिनिशिंग जाळीने प्रतिबंधित केले होते. वनविभागाचे कर्मचारी शेतात तैनात केले होते. हाच प्रयोग ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गावात राबविण्याची मागणी केली जात आहे. असे असले तरी आजच्या स्थितीत शेतात येत असलेली वाघाची डरकाळी शेतकऱ्यांना भयभीत करून सोडत आहे. यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.