रक्तपेढ्यांमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा
By परिमल डोहणे | Published: May 14, 2024 02:23 PM2024-05-14T14:23:53+5:302024-05-14T14:24:30+5:30
चंद्रपूर ब्लड बँकेतील स्थिती : स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांची कमी झालेली संख्या व गैरसमजुतीमुळे रक्तदानाचा टक्का घसरला आहे. परिणामी, शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. धक्कादायक म्हणजे, शासनाच्या 'ई रक्तकोष पोर्टल'वर खासगी रक्तपेढ्यात, तर नाहीच्या बरोबरीत रक्तसाठा उपलब्ध असल्याची नोंद आहे.
रक्ताची भीषण टंचाई पाहता दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन केले जात आहे. चंद्रपुरात शासकीयसह खासगी रुग्णालयातून अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी अनेक खासगी रुग्णालये आहेत. यामुळे चंद्रपूर, गडचिरोलीसह, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील रुग्ण चंद्रपुरात उपचारांसाठी येतात. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. याशिवाय, सिकलसेल, थलेसेमिया, कॅन्सरबाधित रुग्णांना नियमित रक्त द्यावे लागते. यांना रक्तपुरवठा करणाऱ्या चंद्रपुरातील जनरल हॉस्पिटल ब्लड बैंक ही शासकीय, ख्रिस्तानंद एज्युकेशन सोसायटी ब्लड सेंटर चंद्रपूर ही चॅरिटेबल ब्लड बैंक, तर संजीवन ब्लस सेंटर व अंकुर ब्लड सेंटर या दोन खासगी ब्लड बँक आहेत.
परंतु, या सर्वच ब्लड बँकेचा विचार केल्यास बोटावर मोजण्याइतक्या रक्तपिशव्या उपलब्ध असल्याचे पोर्टलवर दिसून येत आहे. खासगी रुग्णालयात तर नाहीच्या बरोबरीतच रक्तपिशव्या असल्याची पोर्टलवर नोंद आहे. त्यामुळे तुटवळा भासण्याची शक्यता आहे.
'ई रक्तकोष पोर्टल' नुसार रक्तपेढ्यांमधील सोमवारची अशी होती स्थिती
रक्तपेढीचे नाव एबी+ ए+ बी+ ओ+ ए- बी- ओ-
अंकुर हॉस्पिटल ० १ १ ० ० ० ०
संजीवनी ब्लड ० ० ० ० १ १ ०
ख्रिस्तानंद ४ १७ १५ १० ० ० ०
जनरल हॉस्पिटल १२ १८ ४७ ३८ १ ० २
सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा
उन्हाळा असल्याने रक्तदान शिबिर घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत रक्ताचा साठा अल्प प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिर राबविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासोबतच इतर रक्तदात्यांनीसुद्धा रक्तदानासाठी सामोरे जाणे गरजेचे आहे.
दररोज ५० पिशव्यांची मागणी
चंद्रपूर शहरात अनेक अद्ययावत खासगी रुग्णालये आहेत. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून येथे चंद्रपूर, गडचिरोलीसह, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यामुळे येथे दररोज ४० ते ५० युनिटची मागणी असते. मात्र, त्या
तुलनेत ब्लड संकलित होताना दिसून येत नाही. परिणामी ब्लडची टंचाई नेहमीच दिसून येत असते.
चंद्रपुरात दररोज ४० ते ५० युनिटची आवश्यकता असते. त्या तुलनेत ब्लड संकलित होण्याचे प्रमाण कमी असते. सद्यःस्थितीत जिल्ह्यात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. रक्तदान श्रेष्ठदान असल्याने सामाजिक संस्था, तसेच रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे.
-डॉ. अमित प्रेमचंद, रक्तपेढी विभाग प्रमुख, चंद्रपूर