बाबुपेठात विकासकामांचा पत्ताच नाही

By admin | Published: January 22, 2015 12:54 AM2015-01-22T00:54:55+5:302015-01-22T00:54:55+5:30

चंद्रपूर महानगरपालिका आपल्या सीमेचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी आजुबाजुच्या ग्रामपंचायतींना जोडण्याचा प्रस्तावही मनपाने तयार केला आहे.

There is no address of development work in Babupetha | बाबुपेठात विकासकामांचा पत्ताच नाही

बाबुपेठात विकासकामांचा पत्ताच नाही

Next

रवी जवळे चंद्रपूर
चंद्रपूर महानगरपालिका आपल्या सीमेचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी आजुबाजुच्या ग्रामपंचायतींना जोडण्याचा प्रस्तावही मनपाने तयार केला आहे. दुसरीकडे ज्या वस्त्या मनपा हद्दीत आहे, त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. तेथील समस्यांचा निपटाराच अद्याप महानगरपालिकेला करता आला नाही. बाबुपेठ प्रभागात तर विकासकामांचा पत्ताच नसल्याचे दिसून आले. एकदोन रस्त्यांचे अपवाद वगळले तर संपूर्ण प्रभागातच रस्त्यांची कामे प्रलंबित आहे.
चंद्रपूर शहराच्या एका बाजुला असलेल्या बाबुपेठ परिसराकडे महानगरपालिकेचे अद्याप लक्षच गेले नसल्याचे दिसून येते. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर विविध करांमध्ये वाढ करण्यात आली. एलबीटीसह विविध योजनांचा निधीही मनपाला प्राप्त होत आहे. असे असले तरी बाबुपेठ प्रभागाच्या विकासासाठी मनपा निधी देण्यात कुचराई तर करीत नाही ना, असा प्रश्न या प्रभागात फिरल्यानंतर उपस्थित होतो. लोकमत चमूने आज बुधवारी बाबुपेठ प्रभागात फेरफटका मारला असता अनेक समस्या दिसून आल्या. नागरिकांनीही पोटतिडकीने लोकमतजवळ आपल्या समस्या मांडल्या. बाबुपेठ प्रभाग शहरातील फार जुनी वस्ती आहे. अनेक वर्षांपूर्वी या वस्तीकडे पालिका प्रशासनाने फारसे लक्ष घातले नाही. त्यामुळे या वस्तीचा फारसा विकास तेव्हा झालेलाच नव्हता. त्यानंतर मधल्या काळात या परिसरात आणखी नागरी वस्ती वाढू लागली. तेव्हा नागरिकांची ओरड बघता या ठिकाणी रस्ते, नाली, पिण्याचे पाणी या सोई उपलब्ध करून देण्यात आल्या. आता पुन्हा या परिसराकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. शहरात सध्या रस्ते व नाल्यांची कामे जोमात सुरू आहे. मात्र बाबुपेठ प्रभागात चारदोन रस्त्यांचा अपवाद सोडला तर इतर सर्व रस्ते उखडलेले आहेत. यापूर्वी ज्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले, त्या रस्त्यावर सध्या डांबराचा लवलेशही दिसत नाही. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. चंद्रशेखर आझाद चौक परिसरातील रस्त्यांची तर दैना झालेली दिसून आली. या चौकाच्या चारही बाजुचे रस्ते उखडलेले आहेत.
चंद्रशेखर आझाद चौकाच्या फलकापासून थोडे पुढे गेल्यावर सिमेंट रस्ता दिसतो. अलिकडेच हा रस्ता बांधला असावा. मात्र या रस्त्यावरही आता सिमेंट उखडून खड्डे पडले आहेत. नागरिकांनी याबाबत अनेकदा येथील नगरसेवक हनुमान चौखे यांना सांगितले. मात्र त्यांनी याकडे लक्षच दिले नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. फुले चौक परिसरातही रस्त्यांची अशीच अवस्था आहे. विशेष म्हणजे, फुले चौक परिसरातील पथदिवे बंद असल्याचे नागरिकांचे सांगितले. त्यामुळे रात्री या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरले असते. बाबुपेठ प्रभागात नाल्यांची समस्याही रस्त्यांएवढीच भिषण आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी या ठिकाणी नाल्या बांधल्या आहेत. सद्यस्थितीत प्रभागातील बहुतांश नाल्या तुटलेल्या आहेत. नाल्यांचा रस्त्यांकडील काठ खचल्याने नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर येते. काही ठिकाणी पालिकेने अतिशय लहान आणि निमुळत्या नाल्या बांधल्या आहेत. या नाल्यांना स्लोपही नाही. त्यामुळे सांडपाणी वाहत नाही. नाल्या लहान असल्याने प्लॅस्टिकसारखा कचरा नालीत गेला की नाली चौकअप होते. मनपाचे सफाई कर्मचारी तीनचार महिन्यातून एकदा येत असल्याने हा कचरा नालीत तसाच कायम असतो, असेही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव होत आहे. कचराकुंड्या कमी असल्याने रस्त्यावरच कचरा पडलेला असतो.

Web Title: There is no address of development work in Babupetha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.