सहा महिने लोटूनही वेकोलिच्या गृहकराचा करार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 02:03 AM2016-10-19T02:03:03+5:302016-10-19T02:03:03+5:30
दरवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने वेकोलि, एसीसी, लॉयड मेटल व्यवस्थापनाशी गृहकराबाबत मागणी करण्यात येते
घुग्घुस ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : पैशाची चणचण, कर्मचाऱ्यांचे वेतन नाही
घुग्घुस : दरवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने वेकोलि, एसीसी, लॉयड मेटल व्यवस्थापनाशी गृहकराबाबत मागणी करण्यात येते आणि मार्च-एप्रिल दरम्यान व्यवस्थापन, ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये करार करण्यात येते. यावर्षी घुग्घुस ग्रामपंचायतीकडून एसीसी, लॉयड कंपन्याशी करार करण्यात आला. मात्र आॅक्टोबर महिना लोटूनही वेकोलिशी करार करण्यात आला नाही. त्यामुळे वेकोलिकडून गृहकराची रक्कम निश्चित झाली नाही आणि कर न मिळाल्यामुळे घुग्घुस ग्रामपंचायत आर्थिक संकटात सापडली आहे.
घुग्घुस ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अयोग्य नियोजनाअभावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे चार महिन्यापासून वेतन रखडले आहे. केवळ अडव्हान्सवर कारभार चालत आहे. एसीसीकडून २२ लाख, लॉयडकडून ९ लाख तर वेकोलिकडून २१ लाख रुपये दरवर्षी ग्रामपंचायतीला प्राप्त होत असते. या वर्षीचा लायड व एसीसी कंपनीशी करार झाला असला तरी वेकोलिशी अजूनही करार करण्यात आला नाही. त्यामुळे पैश्याची चणचण निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीला आठवडी बाजाराच्या लिलावापासून १३ लाख ९९ हजार व दैनिक गुजरी लिलावापासून २ लाख ९९ हजार रुपये मिळत आहे. त्या व्यतिरिक्त गावातील गृहकर, पाणीपट्टी कराची रक्कम मिळत असते. ग्रामपंचायतीमध्ये ५५ स्थायी व २४ रोजंदारी कर्मचारी असा ७९ कर्मचारी कार्यरत आहे. दर महिन्यात तीन साडेतीन लाख रुपये वेतनावर खर्च होत असते. न्यायालयााने कर वसुली थांबविल्याने ग्रामपंचायतीचे ताळमेळ बिघडले, अशी माहिती आहे. (वार्ताहर)