आरक्षणाचा उमेदवार नसल्याने जिल्ह्यातील २१ गावांमध्ये पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:52 AM2021-02-06T04:52:04+5:302021-02-06T04:52:04+5:30
सरपंचपदाचे आरक्षण जाहीर : अनेक ठिकाणी उपसरपंचाची निवडणूक होणार चंद्रपूर : निवडणूक विभागाने नुकतेच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले. मात्र ...
सरपंचपदाचे आरक्षण जाहीर : अनेक ठिकाणी उपसरपंचाची निवडणूक होणार
चंद्रपूर : निवडणूक विभागाने नुकतेच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले. मात्र जिल्ह्यातील २१ गावांमध्ये आरक्षणानुसार निवडून आलेला सदस्यच नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. यामध्ये सावली तालुक्यातील आठ, चिमूर तालुक्यातील पाच व ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ गावांचा समावेश आहे.
चिमूर तालुक्यातील सातारा, वाकरला, कोलारी, नवतला व साठगाव येथील सरपंचपदाचे आरक्षण अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती महिला असे पडले आहे. मात्र या प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षणात एकही जागा नव्हती. त्यामुळे विजयी उमेदवारात या प्रवर्गातील एकही महिला व पुरुष सदस्य नाही. सावली तालुक्यातील पारडी व मेहा बुज. येथील सरपंचपद अनुसूचित जाती महिला, लोंढोली, साखरी, बेलगाव, जीबगाव अनुसूचित जमाती महिला, व्याहाड बूज, वाघोली बुटी अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. मात्र येथे या आरक्षणपदाचे उमेदवारच नसल्याने ओरड सुरू आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, जवराबोडी मेंढा, चांदली, रानबोथली, पारडगाव, रामपुरी, कोथुलना, कन्हाळगाव येथील सरपंचपदाच्या आरक्षणामुळे पेच निर्माण झाला आहे. गांगलवाडी, जवराबोडी मेंढा येथे अनुसूचित जाती महिला, चांदली, पारडगाव येथे अनुसूचित जातीचे आरक्षण काढण्यात आले आहे. मात्र येथे या प्रवर्गाचा उमदेवारच नसल्याने मोठी पंचाईत निर्माण झाली आहे.
बॉक्स
या गावांमध्ये पेच
चिमूर तालुक्यातील सातारा, वाकरला, कोलारी, नवतला व साठगाव, सावली तालुक्यातील पारडी, मेहा बुज, लोंढोली, साखरी, बेलगाव, जीबगाव, व्याहाड बूज, वाघोली बुटी, ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, जवराबोडी मेंढा, चांदली, रानबोथली, पारडगाव, रामपुरी, कोथुलना, कन्हाळगाव आदी गावांमध्ये सरपंचपदांमध्ये पेच निर्माण झाला आहे.
बॉक्स
राजुऱ्यात आरक्षणासाठी तहसीलदारांना निवदेन
राजुरा तालुक्यातील चुनाळा ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला आले आहे. त्यामुळे चुनाळावासीयांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, आरक्षण बदलविण्यात यावे, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन दिले. चुनाळा ग्रामपंचायतमध्ये सर्वसामान्य महिला आरक्षण १९९५ पासून १९९९, २०१० ते २०१५ अनुसूचित महिला आरक्षित होते. यंदासुद्धा महिला आरक्षण आल्याने नाराजी पसरली आहे. १३ सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये सात महिला निवडूण आल्या आहेत. मात्र त्यापैकी एकही महिला सरपंच बनण्यास इच्छुक नाही.