आनंदवनाच्या कामात जातीपातीला थारा नाही - महारोगी सेवा समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 01:25 AM2020-07-01T01:25:52+5:302020-07-01T01:25:59+5:30
आर्थिक गैरव्यवहार केल्याने सौसागडे यांना कामावरून कमी केले
वरोरा (चंद्रपूर) : कर्मयोगी बाबा आमटे यांनी आपल्या काही मोजक्या सहकाऱ्यांना घेवून आनंदवनाची निर्मिती केली. तेव्हा बाबांनी आनंदवनात कुठल्याही जातीपातीला थारा दिला नाही. श्रमाला महत्त्व दिले. आजही हेच तत्व पाळले जात आहे. परंतु काही जातीपातीचा मुद्दा अकारण उपस्थित करून महारोगी सेवा समितीला बदनाम करीत आहे. आनंदवनचे माजी सरपंच राजू सौसागडे यांनी केलेले आरोप खोटे असून त्यांनी स्वत:च आर्थिक गैरव्यवहार केल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे, असे महारोगी सेवा समितीने म्हटले आहे.
माजी सरपंच तथा आनंदवन ग्रामपंचायतचे सरपंच राजु सौसागडे यांचे आई-वडील आजही आनंदवनात वेगळे राहतात. त्यांची सर्व जबाबदारी महारोगी सेवा समिती घेत आहे. राजू सौसागडे व त्यांची पत्नी आनंदवनातील संस्थेच्या निवासस्थानी राहून काम करीत होते. विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असताना आपल्या सोबत काम करणाऱ्यांना दमदाटी देणे, स्पेअरपार्टची चोरी करणे असे अनेक गैरव्यवहार केले आहे. याबाबत तक्रारी आल्यानंतर त्याला विश्वस्तांनी व कार्यकर्त्यांनी समजाविले. परंतु त्यांचा हा गैरव्यवहार कायम राहिला. सरपंच असताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. याशिवाय विश्वस्तांना भडकविणे, खोट्या गोष्टी पसरविणे, अशा अनेक बाबीमुळे त्यांना व त्याच्या पत्नीला कामावरून काढले. त्यानंतरही अशीच वागणूक सातत्याने राहिल्याने ग्रामसभेने ठराव मंजूर करून त्याला घर खाली करण्यास सांगितल्याचे महारोगी सेवा समितीने म्हटले आहे.
राजू सौसागडे याला आॅक्टोबर १९ मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप असल्याने कामावरून काढले. त्याच्या पत्नीलाही काढले. त्याच वेळेस त्यांना निवासस्थान सोडण्यास सांगितले. परंतु त्यांनी सोडले नाही. कोरोना काळात त्यांना काढण्याचा विचारही केला नाही. त्यांच्याविरूध्द पोलिसात तीन तक्रारी दिल्या. त्या अदखलपत्र आहे. त्यानंतरही त्यांची वागणूक सुधारली नाही. आनंदवनात जातीपातीला थारा नाही. तरीही त्यांनी यावरून प्रचंड मानसिक त्रास दिला. - डॉ. शितल आमटे-कराजगी, सीईओ, महारोगी सेवा समिती, आनंदनवन, वरोरा