कोट्यवधी खर्चूनही सिंचनात वाढ नाही
By admin | Published: July 13, 2015 01:06 AM2015-07-13T01:06:38+5:302015-07-13T01:06:38+5:30
जिल्ह्यात मागील १५ वर्षांमध्ये विविध आर्थिक स्त्रोतातून ९०० पेक्षा अधिक कोल्हापुरी बंधारे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आले.
हिरवे स्वप्न भंगले : कोल्हापुरी बंधाऱ्याचे रूपांतर सिमेंट प्लगमध्ये करण्याची मागणी
चंद्रपूर: जिल्ह्यात मागील १५ वर्षांमध्ये विविध आर्थिक स्त्रोतातून ९०० पेक्षा अधिक कोल्हापुरी बंधारे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आले. मात्र गावपातळीवरील नियोजनाच्या अभावामुळे हे बंधारे कोरडे असून त्यामुळे शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगले आहे.
जिल्हा परिषद सिंचन विभाग, लघु पाटबंधारे विभाग, जलसंधारण विभागाच्या माध्यमातून नक्षलग्रस्त निधी, राष्ट्रीय सम विकास आदिवासी उपयोजना, जलस्वराज, दुष्काळ निधी, विदर्भ पॅकेज, स्थानिक विकास निधी, खनिज विकास निधी, जिल्हा वार्षीक नियोजन अशा विविध स्त्रोतातून हे बंधारे बांधण्यात आलेत. एका बंधाऱ्यावर ५ लाख रुपयांपासून ६० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला. एका बंधाऱ्यामागे ५० हेक्टर ते २५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, अशी अपेक्षा होती. मात्र जिल्हाभरातील कोल्हापुरी बंधारे आता शोभेची वास्तू ठरली आहे. गावपातळीवरील पाणी वाटप संस्था कागदावरच आहेत. या विषयात नियोजन नसल्याने बंधाऱ्यात पाणीच नसल्याचे चित्र सर्वदूर दिसून येते. बांधकामानंतर प्लेट गावपातळीवर पोहचत नाही. एकदा बंधाऱ्याचे बांधकाम झाले की, त्यानंतर बंधाऱ्यात पाणी अडले की नाही, हे पाहण्याचे साधे सौजन्यही कुणी दाखवत नाही. शासनाकडून दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. मात्र जलसंधारणच्या जन्माची व्यथा ‘पुढचे पाठ मागे सपाट’ अशीच झाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये बंधारे बांधले खरे, पण त्यात पाणीसाठी होत नाही. खरे तर या उपक्रमातून जिल्ह्यात २५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येवून शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ व्हायला पाहिजे. परंतु चित्र उलटे आहे. भूगर्भात पाण्याची पातळी वाढली नाही. पाणी अडविल्या जात नाही. असे असले तरी दरवर्षी नविन बंधाऱ्यांची निर्मिती केली जात आहे.
कोरपना तालुक्यातील कुकुळबोडी, कातलबोडी, बोरगाव येथे १ कोटी ५० लाख रुपये खर्च करून २०१३-१४ मध्ये बंधाऱ्याचे काम हाती घेतले. परंतु अद्यापर्यंत प्लेटांचा पुरवठा झाला नाही. कोरपना, जिवती, राजुरा तालुक्यात शेकडो बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र ९० टक्के प्लेट चोरील्या गेल्या. बांधकाम होऊनसुद्धा पाणी अडविले नाही. याबाबत कॉंग्रेसचे आबिद अली यांनी कोल्हापुरी बंधाऱ्यांचे वास्तव पुढे ठेवून आमसभेत ठराव पारित करण्याचा आग्रह धरला. नवीन कोल्हापुरी बंधारे बांधकाम तालुक्यात करूच नये, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर नविन बांधकाम होणार नाही, असा ठराव पारिीा झाला.
देवघाट नाल्यावर माथा ते पायथ्यापर्यंत सात कोल्हापुरी बंधारे उभे आहेत. या कामासाठी अडीच कोटींचा खर्च झाला. मात्र या बंधाऱ्यात पाण्याचा एक थेंबही नाही. उन्हाळ्यात नाल्याच्या काठावरील गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. मात्र पिपर्डा या गावात लोकसहभागातून २ लाख ४६ हजार रुपये खर्चातून सिमेंट प्लग बंधाऱ्याची निर्मिती केली. गावकऱ्यांनी योग्य नियोजन केल्याने पिपर्डा हे गाव ‘पाणीदार’ म्हणून पुढे आले. या गावातील कोल्हापुरी बंधाऱ्यावर दगडी भिंत घालून बंधाऱ्यात पाणी साठविले. परिसरातील विहीरीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली.
१५० हेक्टर शेतात शेतकरी सिंचनाचा लाभ घेत आहे. जिल्हाभरातील कोल्हापुरी बंधारे दुरूस्ती, २ मीटर बाय १ मीटर दगडी बांध, गेट बंद करणे व गेट खोलीकरण कार्यक्रम शासनाने राबवावा. जलयुक्त शिवार कार्यक्रमात बंधाऱ्यांचा समावेश करून धडक कार्यक्रम राबविल्यास जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक गावांना त्याचा लाभ होईल. यासाठी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आबीद अली यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना भेटून कोल्हापुरी बंधाऱ्याचे सिमेंट प्लगमध्ये रूपांतर करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)