काेराेना नियंत्रण माेहिमेत शिक्षकांना विमाकवच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:36 AM2021-04-30T04:36:02+5:302021-04-30T04:36:02+5:30
चंद्रपूर : काेविड नियंत्रणाच्या माेहिमेत आरोग्य विभागासोबत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगर परिषदेचे शिक्षक ग्रामीण व शहरी भागात काम ...
चंद्रपूर : काेविड नियंत्रणाच्या माेहिमेत आरोग्य विभागासोबत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगर परिषदेचे शिक्षक ग्रामीण व शहरी भागात काम करीत आहेत. मात्र, या शिक्षकांना शासनाने विमा कवचापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रुग्णसंख्येसोबतच मृतकांची संख्यासुद्धा वाढत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोना साथरोग नियंत्रण मोहिमेसाठी शिक्षकांचा सहभाग घेतला आहे. यामध्ये कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, कोरोना प्रतिबंधक लसीकरण जनजागृती, चेक पोस्टवर बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण, आदी महत्त्वाची कामे जिल्हा परिषद व खासगी शाळांमधील शिक्षक करीत आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये जाऊनही प्रत्यक काम करणे यासोबतच जिल्हा परिषदेच्या आपत्कालीन कक्षात शिक्षक सेवा देत आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ६५ शिक्षक सेवा देत आहे. मात्र, विमा कवच लागू करण्यात आले नाही. इतर विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची सेवा बजावताना विमा कवच लागू करण्यात आले आहेत. मात्र, शिक्षकांना विमा कवच नसल्याने शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात अनेक शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १५ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.
कोट
कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा खूप घातक आहे. अशा वेळेस ज्या शिक्षकांची नियुक्त्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार विविध कामाकरिता प्रशासनाने केलेल्या आहे त्या सर्वांना शासनाने कोविड विमा कवच लागू केला पाहिजे. त्यासोबतच पात्र व्यक्तींच्या कुटुंबाला एक महिन्याच्या आत हा विमा मिळाला पाहिजे.
- गोविंद गोहणे, तालुका सरचिटणीस महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती, चिमूर
------
कोरोना लढाईत इतर कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा शासनाने लागू केला आहे. पण, यामध्ये शिक्षकांना वगळण्यात आले आहे. शिक्षक मागील वर्षभरापासून कोरोना योद्धा म्हणून शासनाच्या निर्देशाप्रमाणे काम करीत आहे. यात अनेक शिक्षकांचे जीव गेले आहेत. त्यांचे संसार उघड्यावर पडले आहे. त्यामुळे शिक्षकांना ५० लाख विमा कवच शासनाने द्यावे.
- सुरेश डांगे, जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती, चंद्रपूर
-------
मागील वर्षी कोरोना नियंत्रणासाठी लागलेल्या शिक्षकांना विमा कवच होते. मात्र, त्याचा कालवधी संपला आहे. सद्य:स्थितीत जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यातील शिक्षकांची कोरोना साथरोग नियंत्रणासाठी ड्यूटी लावण्यात आली आहे. सद्य:स्थितीत यातंर्गत जिल्ह्यातील ६५ शिक्षक कार्यरत आहे. मात्र, त्यांना विमा कवच नाही. काेराेना साथराेग नियंत्रण माेहिमेत शिक्षकांची आलटूनपालटून ड्यूटी लावली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील काही शिक्षकांना बाधा झाली आहे. त्यापैकी १५ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.
- दीपेंद्र लोखंडे,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि. प. चंद्रपूर