आठव्या दिवशीही आंदोलनाची दखल नाही
By admin | Published: March 9, 2017 12:45 AM2017-03-09T00:45:31+5:302017-03-09T00:45:31+5:30
गेल्या आठवड्याभरापासून भूमिहीन प्रकल्पग्रस्त न्याय मिळेल, या अपेक्षेत नोकरीसाठी वेकोलि माजरीच्या नागलोन खुल्या कोळसा खदानीत रात्रंदिवस आंदोलन करीत आहेत.
वेकोलिचे ४० कोटींचे नुकसान : प्रकल्पग्रस्त भूमिकेवर ठाम
माजरी : गेल्या आठवड्याभरापासून भूमिहीन प्रकल्पग्रस्त न्याय मिळेल, या अपेक्षेत नोकरीसाठी वेकोलि माजरीच्या नागलोन खुल्या कोळसा खदानीत रात्रंदिवस आंदोलन करीत आहेत. आज बुधवारी सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा होत असताना येथे मात्र मोठ्या संख्येने महिला न्यायासाठी संघर्ष करताना दिसून आल्या.
असे असतानाही वेकोलि प्रशासन व जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागणीकडे जणू पाठच दाखवली आहे. या आंदोलनात अनेक वयोवृद्ध महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. या आठवड्याभरात वेकोलिचे १३५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प झाले असून ४० कोटींचा फटका बसला आहे. वेकोलि माजरीच्या कार्मिक प्रबंधक त्रिपाटी यांच्या स्वाक्षरीने २५ प्रकल्पग्रस्तांची यादी नोकरीसाठी मंजूर करण्यात आली. ही यादी आंदोलनस्थळी सूचना फलकावर लावली आहे. याबाबत कार्मिक प्रबंधक त्रिपाटी यांना विचारणा केली असता वेकोलि नागपूरमधून मंजुरी मिळाल्याचे लोकमतला सांगितले. परंतु इतर शिल्लक प्रकल्पग्रस्तांबाबत विचारले असता फोन बंद करुन दिला.
भूमिहीन प्रकल्पग्रस्त महिलांनी आंदोलनस्थळावर क्रांतीज्योती सावित्रीबाई व आई जिजाऊच्या प्रतिमांना समोर ठेवून त्यांना संघर्षासाठी शक्ती मागितली.(वार्ताहर)
दिशाभूल करण्याचा प्रयत्न : प्रकल्पग्रस्त
२५ जणांना नोकरीत समाविष्ट करण्याची सूचना फलकावर लावली. मात्र हे पत्र खोटे असून त्या पत्रामध्ये अनेक चुका आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या नावातही चुका आहेत. आदेश क्रमांक टाकलेले नाही आणि कोल इंडियाच्या वेबसाईटवर कुठेच याचा उल्लेख नाही. म्हणून ही सूचना आम्हा प्रकल्पग्रस्तांना दिशाभूल करण्याकरिता लावले असून जर २५ जणांना समाविष्ट करण्याचा आदेश आला असता तर तो आदेश आमच्या हाता दिला असता. त्यांना सूचना फलकावर लावण्याची गरज नाही. हे पत्र चुकीचे आहे, असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे.