प्रकल्पग्रस्तांना सुविधा पुरविण्यात हयगय नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 05:00 AM2021-11-10T05:00:00+5:302021-11-10T05:00:47+5:30
पैनगंगा कोळसा खाणीत दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाला. औद्योगिक जिल्ह्यात अशा दुर्घटना घडणे योग्य नाही. त्यामुळे प्रकल्प प्रमुखांनी कामगार कायद्यांचे पालन करावे. कामगारांच्या मृत्यूची चौकशी आठवडाभरात करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना दिले. कोळसा खाणीत शेकडो कामगार कार्यरत आहेत. त्यांना कायद्याप्रमाणे वेतन व भत्ते वेळेत मिळावेत. अनेक कारखान्यांमध्ये वेतनाबाबत तफावत असल्याने समानता असावी. वेकोलिने करार तत्त्वावरील कामगारांना श्रमाचा योग्य मोबदला द्यावा, असे निर्देश मंत्री वडेट्टीवार यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढून वेकोलिने नागरी सुविधा पुरवाव्यात. या कामात हयगय करू नये. येत्या दोन आठवड्यात याबाबत पुन्हा आढावा घेण्यात येईल, अशी सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकल्पग्रस्त आढावा बैठकीत केली.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, वेकोलि वणी क्षेत्र व्यवस्थापक आर. बी. सिंह, उपप्रबंधक रोहित मेश्राम, अधीक्षक एम. वाय. पुरटकर आदींसह देवगडे, मारोती पिंपळकर, गौतम धोटे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पैनगंगा कोळसा खाणीत दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाला. औद्योगिक जिल्ह्यात अशा दुर्घटना घडणे योग्य नाही. त्यामुळे प्रकल्प प्रमुखांनी कामगार कायद्यांचे पालन करावे. कामगारांच्या मृत्यूची चौकशी आठवडाभरात करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना दिले. कोळसा खाणीत शेकडो कामगार कार्यरत आहेत. त्यांना कायद्याप्रमाणे वेतन व भत्ते वेळेत मिळावेत. अनेक कारखान्यांमध्ये वेतनाबाबत तफावत असल्याने समानता असावी. वेकोलिने करार तत्त्वावरील कामगारांना श्रमाचा योग्य मोबदला द्यावा, असे निर्देश मंत्री वडेट्टीवार यांनी दिले. जमिनीच्या भूसंपादनाचा मोबदला व पुनर्वसनसंदर्भात शेतकऱ्यांशी वाटाघाटी करावी. कोळसा खाणीमुळे त्या भागात प्रदूषण होते. यासाठी पर्यावरण विभागाने पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी. वेकोलिने धुळीवर दररोज पाणी टाकण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
सहा महिन्यांत पुनर्वसन
- पैनगंगा प्रकल्पांतर्गत विरूर गाडे येथील ७२ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी जलदगतीने काम करावे. पात्र उर्वरित ३८ कुटुंबांपैकी १९ कुटुंबांचे पुनवर्सनस्थळी भूखंड विकल्प बदलाच्या प्रस्तावांवर व अनुदान विकल्पास मंजुरी द्यावी. प्रकल्पग्रस्तांचा हक्क डावलू नये. पुनर्वसनाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केली. कोळसा खाणीमुळे शेताकडे जाण्याचे रस्ते बंद झाले. नदीचे प्रवाह बदलल्याने सर्वेक्षण करावे, अल्ट्राटेक सिमेंट उदयोगातील कामगारांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था कार्यस्थळी करावी, असेेही मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी कामगारांनी अडचणी मांडल्या.