पंचायत समितीच्या इमारतीतच सार्वजनिक स्वच्छतागृहाची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:28 AM2021-09-11T04:28:07+5:302021-09-11T04:28:07+5:30
नागभीड : तीन कोटी रुपये खर्च करून तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या येथील पंचायत समितीच्या इमारतीत सार्वजनिक स्वच्छतागृहाची वानवा ...
नागभीड : तीन कोटी रुपये खर्च करून तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या येथील पंचायत समितीच्या इमारतीत सार्वजनिक स्वच्छतागृहाची वानवा आहे. परिणामी पंचायत समितीत कामासाठी येणाऱ्यांची काही वेळेस मोठी अडचण होत आहे.
पंचायत समितीची १९६९मध्ये बांधण्यात आलेली इमारत जीर्ण झाल्यानंतर सहा वर्षांपूर्वी पाडण्यात आली. आणि त्याठिकाणी नवीन २ कोटी ९८ लाख रुपये किमतीची इमारत बांधण्यात आली. तीन वर्षांपूर्वीच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीत दीड वर्षापूर्वी प्रशासकीय कामकाजही सुरू करण्यात आले. या इमारतीत कर्मचाऱ्यांसाठी इमारतीच्या आतमध्येच स्वच्छतागृह बांधण्यात आले आहेत. मात्र, कामे घेऊन येणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी पंचायत समिती परिसरात अशी कोणतीही सुविधा नाही.
शासन स्वच्छता मोहिमेवर मोठ्या प्रमाणावर भर देत आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून प्रत्येक शासकीय, निमशासकीय आणि सार्वजनिक ठिकाणी शौचालय निर्मितीवर भर देण्यात येत आहे. आता गावागावात आणि स्थलांतरित व्यक्तींसाठी शासन सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देणार आहे. तसे आदेशही निर्गमित झाल्याची माहिती आहे. मात्र, पंचायत समितीत कामे घेऊन येणाऱ्या शेकडो लोकांची वर्दळ असते, हे उघड सत्य असूनही ही इमारत निर्माण करण्यात आली. त्यावेळी याकडे कानाडोळा करण्यात आला. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात ५६ ग्रामपंचायती आणि ११० गावे आहेत. या गावांमधून या पंचायत समितीच्या कार्यालयात रोज शेकडो लोकांची वर्दळ असते. मात्र, सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने खेड्यापाड्यातून कामे घेऊन येणाऱ्यांची गैरसोय होत आहे.
100921\img_20210910_162041.jpg
पंचायत समितीचे प्रशासकीय भवन