लॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथिलता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 05:00 AM2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:42+5:30

लॉकडाऊन संदर्भात कोणत्याही अफवांना बळी पडू नये. राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यांमध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे. लॉकडाऊन शिथील करण्याबाबत व त्यामध्ये काही विशिष्ट सूट देण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊन कायम राहील. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र कोरोना विषाणूच्या उद्रेकाला वेळ लागत नाही.

There is no relaxation in the lockdown | लॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथिलता नाही

लॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथिलता नाही

Next
ठळक मुद्देकुणाल खेमनार : ३ मेपर्यंत कुणीही घराबाहेर पडू नये, अफवांना बळी पडू नये

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणू विरुद्ध सुरू असलेल्या लढा पुढील ३ मेपर्यंत कायम ठेवायचा असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथीलता नाही. ३ मेपर्यंत कोणीही घराबाहेर पडणार नाही. याची खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे.
लॉकडाऊन संदर्भात कोणत्याही अफवांना बळी पडू नये. राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यांमध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे. लॉकडाऊन शिथील करण्याबाबत व त्यामध्ये काही विशिष्ट सूट देण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊन कायम राहील. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र कोरोना विषाणूच्या उद्रेकाला वेळ लागत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून ३ मेपर्यंत काटेकोरपणे लॉकडाऊन पाळण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.
पोलीस प्रशासनाने सोमवारपासून कारवाई कठोर करण्याचा निर्णय घेतला असून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तूंची सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत ठेवलेली वेळ तशीच राहील. अन्य कोणताही बदल उद्यापासून होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी ३ मेपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या स्पष्ट निर्देशाची वाट बघावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या काळात नागरिकांनी घरातच सुरक्षित रहावे. आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन आहे.

तीन महिने भाडे वसुली नाही
राज्यात भाडयाच्या घरामध्ये राहणाºया नागरिकांकडून कोरोना विषाणू संघर्षाच्या काळामध्ये ३ महिन्यांचा किराया घेऊ नये, असे राज्याच्या गृहनिर्माण विभागाने स्पष्ट केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घरमालकांनीदेखील किरायादारांकडून सक्तीने घरभाडे वसुली करू नये व त्यांना घरातून काढू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे. जिल्ह्यात मोठया प्रमाणात भाडेकरू आहेत. यापैकी अनेकांचे रोजगार सध्या सुरू नाहीत. त्यामुळे घर मालकांनी घर भाडयासाठी आग्रही राहू नये. परिस्थिती नसेल तर पुढील ३ महिने घर भाडयाची मागणी करू नये. या काळात भाडे न दिल्यास किंवा भाडे थकल्यामुळे कोणतेही भाडेकरूंना भाडयाच्या घरातून निष्कासित करण्यात येऊ नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिले आहेत. या प्रमाणे जिल्ह्यामध्ये देखील सक्तीने भाडे वसुली करू नये असे त्यांनी स्पष्ट केले आहे

११ लाखांवर दंड वसूल
संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांकडून ११ लाखांवर दंड वसूल करण्यात आला असून एकूण १८७ प्रकरणात ही कारवाई केली आहे. तर जिल्ह्यात ६९३ वाहने जप्त करण्यात आली आहे.

आरोग्य कर्मचारी महत्त्वाचा योध्दा
या लढयातील महत्त्वाचा योद्धा म्हणजे आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, डॉक्टर, परिचारीका, एएनएम, आशा व अंगणवाडी सेविका हे आहेत. ग्रामीण भागातील सहा हजार ४३५, शहरी भागात ४३१ तर महानगरपालिका अंतर्गत ३०४ म्हणजेच जिल्ह्यांमध्ये सर्व आरोग्य विभागाचे एकूण ७१७० आरोग्य कर्मचारी काम करीत आहे.

२, ५६३ अंगणवाडी सेविका कार्यरत
जिल्ह्यातील ५९५ ग्रामसेवक, दोन हजार ५६३ अंगणवाडी सेविका, दोन हजार ३९२ अंगणवाडी मदतनीस, एक हजार ९०७ आशा वर्कर, एक हजार ३०० ग्राम कर्मचारी या काळात देवदूत बनून रस्त्यांवर उतरले आहेत.

स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग
या युद्धात स्वयंसेवी संस्थाचा सुद्धा महत्त्वाचा सहभाग आहे. जिल्ह्यामध्ये स्वयंसेवी संस्थेचा व इतर मनुष्यबळ ग्रामीण भागात २३१०, शहरी भागात ९२९, महानगरपालिका अंतर्गत १८७० असे एकूण पाच हजार १०९ इतर मनुष्यबळ कार्यरत आहे. त्याचप्रमाणे सोयी सुविधेसंदर्भात व आवश्यक असणारी माहिती आपल्यापर्यंत पोहचविणारे पत्रकार, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे दुकानदार, तसेच विद्युत कर्मचारी असे अनेक अनामिक योध्दे या कोरोना विरुध्दच्या लढयात सहभागी आहेत. हा आकडा एकत्रित केल्यास १५ हजारावर कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी कार्यरत आहेत.

कोरोना विरुद्धच्या लढ्यात ११ हजार कर्मचारी
चंद्रपूर जिल्ह्यात १९ एप्रिलपर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. मात्र ही परिस्थिती कायम राहावी, जिल्ह्यात कोरोना आजाराचा शिरकाव होऊ नये, यासाठी डोळ्यात तेल घालून विविध विभागाचे हजारो कर्मचारी काम करीत आहे. जीव धोक्यात घालून तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी, जागता पहारा देणारे पोलीस, महानगरपालिका, नगरपालिकेचे सफाई कामगार ते सीमावर्ती भागातील ग्रामपंचायतीच्या शिपायांपर्यंत सगळेच कर्मचारी कोरोना विरुद्धच्या लढाईत खरे हिरो ठरले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात जवळपास ११ हजार कर्मचारी सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या विरुद्ध कार्यरत आहेत. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत या तिघांच्या नेतृत्वात २०० डॉक्टर आणि ३०० आरोग्य कर्मचारी अग्रणी आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रत्यक्ष तपासणी करण्यापासून तर जिल्ह्याच्या टोकावरील गावांमध्ये आलेल्या नव्या रुग्णांची नोंद घेण्यापर्यंत आरोग्य विभाग आपली सेवा देत आहे. प्रत्येकाकडे कामांचे वाटप करण्यात आले असून समन्वयाची भूमिका जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले पार पाडत आहे. महसूल, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन, याशिवाय जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनात काम करणाºया राज्य शासनाच्या अनेक विभागाचे शेकडो कर्मचारी या युद्धात आपला जीव धोक्यात घालून लढत आहेत.

३३७० पोलीस कर्मचारी रस्त्यावर
महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, सर्व तहासीलदार यांच्यासह एक हजार २०६ अधिकारी व कर्मचारी आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागातील १९१ अधिकारी, ३१७९ पोलीस कर्मचारी, असे ३३७० कर्मचारी रस्त्यावर झटत आहे.

Web Title: There is no relaxation in the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.