जिल्ह्यात दुय्यम निबंधकच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:32 AM2021-08-24T04:32:30+5:302021-08-24T04:32:30+5:30
चंद्रपूर : शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणाऱ्या दस्त नोंदणी कार्यालयातील सह दुय्यम निबंधकांसह तालुका दुय्यम निबंधकांची मंजूर १६ ...
चंद्रपूर : शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणाऱ्या दस्त नोंदणी कार्यालयातील सह दुय्यम निबंधकांसह तालुका दुय्यम निबंधकांची मंजूर १६ पैकी १६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे या कार्यालयाचा प्रभार लिपिकाच्या भरोशावर सुरू आहे. त्यातच लिपिकांनासुद्धा दोन ते तीन कार्यालयातील दुय्यम निबंधकांचा प्रभार दिला असल्याने कर्तव्य बजावताना त्यांची मोठी दमछाक होत आहे, तर नागरिकांची कामेसुद्धा प्रलंबित राहत आहेत.
जिल्ह्यात प्रत्येक तालुका स्तरावर एक व चंद्रपूर येथे दोन असे एकूण १६ नोंदणी कार्यालये आहेत. या कार्यालयात शेती व इतर जमीन खरेदी, गहाणखते, दस्त नोंदणी आदी कामे केली जातात. यातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. तालुकास्तरावर तालुका दुय्यम निबंधक व जिल्हा स्तरावर सहदुय्यम निबंधक यांच्यामार्फत हा कारभार बघितला जातो. मात्र जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील दुय्यम निबंधक व सहदुय्यम निबंधक अशी मंजूर १६ पदांपैकी १६ ही पदे मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. कार्यालयातील लिपिकांकडे दुय्यम निबंधकांचा कारभार देण्यात आला आहे. त्यातही अनेक ठिकाणी लिपिकांची पदेसुद्धा रिक्त असल्याने एकाला लिपिकाला दोन ते तीन कार्यालयातील दुय्यम निबंधकांचा कारभार देण्यात आला आहे. कोरोनाची लाट ओसरली असल्याने खरेदी-विक्री प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना मोठी कसरत करावी लागत आहे, तर खरेदी-विक्रीची अनेक कामे प्रलंबित राहत असल्याने नागरिकांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
बॉक्स
एकावरच दोन ते तीन तालुक्यांचा प्रभार
जिल्ह्यातील सर्वच कार्यालयातील दुय्यम निबंधकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे लिपिकांकडे प्रभार देण्यात आला आहे. परंतु, त्यांचीही पदे रिक्त असल्याने एकाकडे दोन ते तीन कार्यालयाचा प्रभार दिला आहे. वरोरा व भद्रावती एकाकडे, ब्रह्मपुरी, नागभीड एकाकडे, राजुरा, जिवती, कोरपना एकाकडे, चंद्रपूर एक व चंद्रपूर कार्यालय दोन एकाचकडे, मूल, सावली, चिमूर, बल्लारपूर येथील पदभार असणाऱ्याकडे सह जिल्हा निबंधक कार्यालयातील टेबलचा भार देण्यात आला आहे.
बॉक्स
प्रशासनाचे आश्वासन फोल
दुय्यम निबंधक कार्यालयातील पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे रिक्त पदे भरावे, यासह विविध मागण्यांसाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. प्रशासनाकडून जागा भरण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले. मात्र अद्यापही जागा भरण्यात आल्या नाही. परिणामी कर्मचाऱ्यांचा ताण वाढत आहे.